ग्राहक पेठेने साकारले २० हजार बिस्कीटांचे गणेश मंदिर
पुणे, 7/9/2019 : ग्राहक पेठेतर्फे अनेक वर्षांपासून गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. यंदा तब्बल २० हजार बिस्कीटे व चॉकलेटचा वापर करुन बिस्कीटांचे गणेश मंदिर साकारण्यात आले आहे. तसेच बिस्कीटांची गणेश मूर्ती देखील ग्राहक पेठेतर्फे तयार करण्यात आल्याने ती पाहण्याकरीता भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी होत आहे.
टिळक रस्त्यावरील स.प.महाविद्यालय चौकामध्ये ग्राहक पेठेतर्फे गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा १८ हजार बिस्कीटे व २ हजार ८०० चॉकलेटस् वापरुन गणेश मंदिर साकारण्यात आले आहे. संपूर्ण मंदिरावर व प्रवेशद्वारावर बिस्कीटांचे नक्षीकाम करण्यात आले आहे. तसेच बिस्कीटांचे पुडे वापरुन मंदिरातील स्तंभ देखील हुबेहुब साकारण्यात आले आहेत.
बिस्कीटांच्या मंदिरासोबतच प्रत्यक्ष गणेशाची मूर्ती देखील बिस्कीटांची करण्यात आली आहे. त्याकरीता ६ किलो छोटी बिस्कीटे व चॉकलेटस् वापरण्यात आली आहे. गणपतीच्या आसनापासून ते मुकुटापर्यंत सजावटीसाठी संपूर्ण मुकुटाचा वापर करण्यात आला आहे. मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली असून भाविकांची गर्दी वाढत आहे.