हंट्समनने केली प्राथमिक शाळेची पुनर्बांधणी, भांबोली गावातील शिक्षणाला मदत

Share this News:

6 ऑगस्ट २०१९: हंट्समन या वैशिष्ट्यपूर्ण रसायनांचे जागतिक स्तरावर उत्पादन व मार्केटिंग करणाऱ्या कंपनीने चाकण तालुक्यातील भांबोली गावात पुनर्बांधणी करून दिलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचे आज उद्घाटन झाले. या सरकारी शाळेच्या इमारतीची पुनर्बांधणी मिटकॉन फाउंडेशनच्या सहयोगाने करण्यात आली. १२० विद्यार्थ्यांना सामावण्याची क्षमता या इमारतीत आहे. भांबोली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हंट्समन वचनबद्ध आहे.

हंट्समन आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षणाच्या क्षेत्रात मुळापासून सुधारणा करण्यास उत्सुक आहे. यासाठी सहा ते दहा या वयोगटातील विद्यार्थ्यांना सुधारित शैक्षणिक संरचना देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. आर्क (एआरसीएच) फाऊंडेशनच्या सहयोगाने हंट्समनने शिक्षणाचा दर्जा सुधारणे, शिक्षणांमधील क्षमता बांधणी आणि उपक्रमाधारित अध्ययन यावर भर देणारा एक कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम मुलांमधील सृजनशीलता वाढवणे, मुलभूत भाषा सुधारणे, गणिती तसेच समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित करणे आणि एकंदर व्यक्तिमत्व विकासात सहाय्य करेल. या कार्यक्रमाचा भाग म्हणून शिक्षकांना उपक्रमाधारित अध्ययनाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. याशिवाय, उपजीविकेच्या साधनांमध्ये सुधारणा, कृषीक्षेत्राचा विकास आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा यांच्या माध्यमातून हंट्समन भांबोली गावाच्या एकंदर विकासावरही भर देणार आहे.

हंट्समन इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे भारतीय उपखंडासाठीचे व्यवस्थापकीय संचालक हर्षद नाईक या उद्घाटनाच्या वेळी म्हणाले, “शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण हे हंट्समनच्या सीएसआर धोरणाचे तीन स्तंभ आहेत. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मुलभूत अधिकार आहे असे आम्हाला वाटते. मुलांच्या व समुदायांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम म्हणजे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यासाठी मिटकॉन व आर्क फाऊंडेशनशी भागीदारी झाल्याबद्दल आम्हाला आनंद आहे आणि आमच्या सर्वोत्तम क्षमतेचा वापर करून समुदायाची सेवा करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

भांबोली गावाचे सरपंच सागर निखाडे यावेळी म्हणाले, “मुलाच्या आयुष्यात शिक्षण महत्त्वाचे आहे, कारण, त्यामुळे शिकणे, ज्ञान मिळवणे, कौशल्य प्राप्त करणे यात मदत मिळते. हंट्समन हा सामाजिक विकासावर एकाग्रतेने लक्ष देणारा ब्रॅण्ड म्हणून आम्हाला परिचित आहे आणि भांबोलीतील शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची आम्ही प्रशंसा करतो. शाळेची नवीन इमारत मुलांना शिक्षणाबद्दल वाटणारी आवड वाढवेल व त्यांना पुन्हा एकाग्रतेने शिक्षणाकडे वळण्यास प्रोत्साहन देईल. हंट्समनच्या टीमसोबत भविष्यकाळातही काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

उद्घाटन समारंभाला चाकण एमआयडीसीचे अधिकारी श्री. भडांगे, पुणे जिल्हा परिषदेतील शिक्षण अधिकारी श्री. सुनील कुराडे, पुणे जिल्ह्यातील खेड पी.एस.चे गटविकास अधिकारी श्री. बाबासाहेब ढवळे, पुणे जिल्ह्यातील खेड पी.एस.चे गट शिक्षण अधिकारी श्री. संजय नाईकवडे, मिटकॉन फाऊंडेशनचे श्री. प्रसाद पवार यांच्यासह भांबोली पंचायतीचे अनेक सदस्य उपस्थित होते.

यापूर्वी हंट्समनने गुजरातमधील बडोदा व अंकलेश्वर भागात ‘आनंदी’ हा उपक्रम राबवला होता. यात उपक्रमाधारित अध्ययनाच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न झाला होता.