महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांची महापुरातही ग्राहकसेवा ‘ मुळशी तालुक्यात रिहे खोऱ्यातील गावांचा वीजपुरवठा सुरु

पुणे, दि. 6 आॅगस्ट 2019 : मुळशी धरणातील तब्बल 38 हजार क्युसेस पाण्याचा मुळा नदीतून विसर्ग सुरु असताना प्रवाहाच्या उलट्या दिशेने जात महापुरातील रोहित्राचा वीजपुरवठा मुख्य वीजवाहिनीमधून बंद करून रिहे खोऱ्यातील 10 गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची कामगिरी करीत महावितरणच्या मुळशी येथील जिगरबाज अभियंते व कर्मचाऱ्यांनी महापुरातही ग्राहकसेवेच्या बांधिलकीचा प्रत्यय दिला.
याबाबत माहिती अशी, की पूरस्थितीमुळे मुळशी धरणातून मुळा नदीत पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. मुळशी तालुक्यातील घोटावडे पुलाजवळ असलेले रोहित्र पुराच्या पाण्यात बुडाल्याने पुढील धोका टाळण्यासाठी रिहे 22 केव्ही वाहिनीचा वीजपुरवठा महावितरणकडून रविवारी (दि. 4) दुपारी बंद करण्यात आला. परिणामी रिहे खोऱ्यामधील रिहे, शेळकेवाडी, घोटावडे, जवळ, कातरखडक, खांबवळी, पिंपोळी आदी 10 गावांचा वीजपुरवठा सुद्धा बंद झाला होता.
पूरस्थितीमुळे रिहे खोऱ्यातील गावांचा पौंड व पिरंगुट गावांशी संपर्क तुटला होता. दुर्गम भागात असलेल्या या गावांना वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अ़डचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे मुळशी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता फुलचंद फड, सहाय्यक अभियंता बी. एस. वावरे व सहकाऱ्यांनी युद्धपातळीवरून पर्यायी व्यवस्थेतून या 10 गावांना वीजपुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र नदीच्या पुरामध्ये बुडालेल्या रोहित्राचा वीजपुरवठा मुख्य वीजवाहिनीपासून खंडित करणे व संभाव्य धोके टाळणे अतिशय आवश्यक होते. त्याशिवाय रिहे खोऱ्यातील गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करणे शक्य नव्हते.
त्यानंतर रविवारी सायंकाळी महावितरणकडून मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सहकार्यासाठी तहसीलदार श्री. अभय चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांना परिस्थितीची माहिती दिल्यानंतर महापुरात बोटीने जाऊन रोहित्राचा मुख्य वीजवाहिनीपासून वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आखण्यात आली. सोमवारी (दि. 5) सकाळी 10 वाजता आपत्ती व्यवस्थापनाचे पथक बोटीसह सज्ज झाले. मुळा नदीत यावेळी 32 हजार क्युसेस पाणी प्रवाहित होत असताना तसेच प्रवाहाच्या उलट्या दिशेला रोहित्र असल्याने ही अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. मात्र महावितरणचे जनमित्र राहुल मालपोटे व शुभम ढिले यांनी हे आव्हान स्विकारले. आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमसोबत बोटीने या दोघांनी महापुराचे सुमारे पाऊण किलोमीटर अंतर कापले. मुसळधार पाऊस सुरु असताना राहुल मालपोटे यांनी रोहित्राच्या खांबावर चढून मुख्य वीजवाहिनीपासून वीजपुरवठा खंडित केला. 10 गावांच्या वीजपुरवठ्यासाठी महत्वाची कामगिरी करून हे पथक सुरक्षितपणे परतले. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रिहे 22 केव्ही वाहिनीचा वीजपुरवठा सुरु केला व रिहे खोऱ्यातील गावे अवघ्या 24 तासांच्या आत पुन्हा प्रकाशमान झाले.
महावितरणच्या ग्राहकसेवेसाठी महापुरातही बांधिलकी दाखविणारे जिगरबाज अभियंते फुलचंद फड, बी. एस. वावरे, जनमित्र राहुल मालपोटे व शुभम ढिले यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकातील प्रमोद बलकवडे, ओंकार बलकवडे, सनी शिर्के, नागेश धनवे, गौरव धनवे, शुभम धनवे, विष्णू गोडांबे, अमोल खानेकर, भरत गुप्ता यांनी मोलाचे सहकार्य केले. या सर्वांचे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. सुनील पावडे यांनी कौतुक केले. तर पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी प्रत्यक्ष मुळा नदीच्या ठिकाणी जाऊन महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांना शाबासकीची थाप दिली व कौतुक केले. मुळशीचे कार्यकारी अभियंता श्री. रवींद्र बुंदेले यांनी ही कामगिरी यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले.