बारामती पॅटर्न नुसार कडक निर्बंध पाळून पुण्यातील वाढत्या रुग्ण संख्येला आळा घाला – अजित पवार

Share this News:

पुणे, दि. १ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये रुग्णांची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. बारामती पॅटर्न नुसार कडक निर्बंध पाळून येथील रुग्णसंख्येला आळा घाला, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे दिले. येथील सर्व अधिकाऱ्यांनी मिळून समन्वयाने सुक्ष्म नियोजन करुन आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवून कोरोनाचा फैलाव थांबवावा, असे आवाहनही श्री.पवार यांनी यावेळी केले.

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार सुनील शेळके, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप विष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्या त्या विभागांकडून करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर आवश्यक ते उपाय सुचवून त्यांची जलदगतीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या व मृत्यू दर कमी करणे गरजेचे आहे. महानगरपालिकांतर्गत असणाऱ्या हॉटस्पॉटनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवावी. कोरोना नियंत्रणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा यासाठी सहभाग घ्यावा. संबंधित अधिकाऱ्यांनी त्या त्या भागातील रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी काटेकोर नियोजन करुन त्यानुसार समन्वय ठेवून अंमलबजावणी करावी. तसेच अति संवेदनशील भागात टेस्टींगचे प्रमाण वाढवण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करण्याबाबत विचार करा. त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून झोपडपट्टी परिसरात तपासणी वाढवून या भागातील स्वच्छतेवर भर द्यावा. तसेच येथील नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप लवकरात लवकर करा, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कंटेंटमेंट भागात पोलीस प्रशासनाने निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी. या परिसरातील नागरिक अन्य भागात ये-जा करु नयेत याची खबरदारी घ्यावी. शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात राहण्यासाठी झोपडपट्टी भागातील कुटुंबियांचे संस्थात्मक क्वारंटाईन करावे. नागरिकांनीही सामाजिक अंतर पाळणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, अशा सामाजिक शिष्टाचाराबाबत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच सद्य परिस्थितीत घालून दिलेले निर्बंध पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्यसेवा सक्षम करा, असे सांगून यासाठी राज्यशासन सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासगी दवाखाने सुरु ठेवण्याबाबत दोन्ही महापालिका आयुक्तांनी कडक निर्देश द्यावेत, अशा सूचना करुन ते म्हणाले, ससून रुग्णालयात कार्यरत डॉक्टरांची खाजगी हॉटेलमध्ये सोय करण्यात येत असून त्या धर्तीवर कोरोना विषयक कामातील पोलीसांची देखील हॉटेलमध्ये सोय उपलब्ध करुन द्यावी.

पुणे, पिंपरी चिंचवड, मालेगाव, औरंगाबाद अशी जास्त रुग्ण संख्या असणारी शहरे वगळून अन्य ठिकाणी इंडस्ट्री सुरु करण्याबाबत राज्य शासन विचाराधीन आहे. येथील ग्रामीण भागातील कारखानदारी सुरु करण्यासाठी नियोजन करावे. तथापी यासाठी आवश्यक त्या नियमांचे व सामाजिक शिष्टाचाराचे पालन करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर शहरी भागातील कंटेंटमेंट भाग वगळता अन्य भागातील कारखानदारी बाबतही नियोजन करावे. निवारागृहात असलेल्या कामगारांना चोख सोयी- सुविधा पुरवाव्यात तसेच पर राज्यातील मजुर, कामगारांच्या स्थलांतराबाबत संबंधित जिल्हाधिका-यांनी एकमेकांशी समन्वय साधून कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विभागातील पुणे, पिंपरी चिंचवड व सोलापूर सह विभागातील कोरोना परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. जास्त रुग्ण असणाऱ्या प्रभागात प्रशासन विभागांच्या वतीने करण्यात येत असणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.
महानगरपालिका क्षेत्रात आढळलेले रुग्ण, या रुग्णांच्या अति निकटच्या संपर्कात आलेले नागरिक, गृहभेटी, फ्ल्यू क्लिनिक मधून निष्पन्न झालेले व प्रवास करुन आल्यानंतर आढळलेल्या रुग्णांची संख्यात्मक माहिती महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारी खबरदारी विशद केली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, डॉ. सुभाष साळुंखे यांनी देखील कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. अतिसंवेदनशील भागात आवश्यक असणाऱ्या उपाययोजना, आवश्यक मनुष्यबळ, टेस्टींग, ट्रेसींगबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची देखील सविस्तर माहिती दिली.