लहान मुलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे स्वत: शोधू द्या – गिरीजा गोडबोले

Share this News:

पुणे, दि. १५ मार्च, २०२० : अनेकदा मुले कंटाळतात तेव्हा आपण त्यांचा कंटाळा घालविण्यासाठी त्यांना इतरत्र व्यस्त करतो, मात्र तसे न करता त्यांना कंटाळू द्या. असे केल्याने मुले आपल्या प्रश्नांची उत्तरे स्वत: शोधतील आणि त्यांच्या सर्जनशीलतेला व सर्वांगिण विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक- गोडबोले यांनी केले.

जंपस्टार्ट इंटरनॅशनल प्री स्कूलच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने स्नेहा तापडिया यांच्या संकल्पनेमधून तयार केलेल्या ‘प्ले ऑन द गो’ या पुस्तकाचे प्रकाशन गिरीजा गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

कोरेगाव पार्क येथील जवाहरलाल नेहरू मेमोरिअल हॉल येथे पार पडलेल्या या स्नेहसंमेलनात फिक्की फ्लो या महिलांच्या संघटनेच्या पुणे विभागाच्या माजी अध्यक्षा संगीता ललवाणी, २ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांच्या विषयातील तज्ज्ञ स्नेहा तापडिया, संस्थेचे आदित्य तापडिया आदि मान्यवर उपस्थित होते.

पालकत्वाच्या सोप्या टिप्स देताना गिरीजा म्हणाल्या, “मुलांना विचार करायची संधी दिली की त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल. बालपणात मुलांची होणारी वाढ ही एक महत्त्वाची गोष्ट असून खेळ यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. यासाठी पालकांनी मुलांना स्क्रीन्स पासून दूर ठेवत खेळामध्ये रमायला शिकवले पाहिजे.”

मुलांची खेळण्याची ही भूक भागविण्यासाठी स्नेहा तापडिया यांनी ‘प्ले ऑन द गो’ या पुस्तकाची संकल्पना पुढे आणली आहे. यामध्ये क्युरेटेड बॅग्ज, क्युरेटेड बॉक्स, थिंक शिट्स आणि सेंसरी प्ले या चार गोष्टींच्या माध्यमातून मुलांच्या बौद्धिक, वैचारिक क्षमतांना चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पुस्तकामध्ये पालकांनी स्वत: मुलांसाठी खेळ तयार करायचे असल्याने मुलांच्या जडणघडणीत पालकांचेही योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याची माहिती, स्नेहा तापडिया यांनी दिली. या पुस्तकामध्ये सांगितलेल्या वस्तूंपासून पालकांनी मुलांसाठी स्वत: खेळ तयार करता येणार असून हे खेळ कसे तयार करायचे याची माहिती देण्यासाठी पुस्तकावर कयूआर कोड देखील देण्यात आला आहे. या कयूआर कोडच्या मदतीने हे खेळ बनविण्याचा व्हिडिओ पालकांना पाहता येणार आहे.