ग्लोबल हॉस्पिटलमध्ये केवळ ४.७ किलोग्रॅम वजनाच्या बाळावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
19/9/19, मुंबई: परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉ. रवि मोहंका आणि डॉ. अनुराग श्रीमाळ यांच्या नेतृत्वाखालील स्पेशलाइझ्ड पेडिअॅट्रिक यकृत प्रत्यारोपण पथकाने ८.५ महिन्याच्या मुलीवर जटील स्वरूपाची यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. या बाळाचे वजन शस्त्रक्रियेच्या वेळी केवळ ४.७ किलोग्रॅम होते. त्यामुळे ही पश्चिम भारतातील आत्तापर्यंतची सर्वांत कमी वजनाच्या रुग्णावरील यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली आहे.
इप्सा कृणाल वलवी या सुरत येथील मुलीला जन्मल्यानंतर लगेचच कावीळ झाली. तिला बायलिअरी अट्रेशिया (बीए) हा क्वचित आढळणारा विकार असल्याचे पुढील तपासणीत स्पष्ट झाले. या अवस्थेमध्ये जन्मत:च बाळाच्या यकृतात पित्तवाहिन्या (बायलरी डक्ट्स) नसतात. त्यामुळे पित्त यकृतात साठून राहते आणि त्यामुळे यकृताचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते, सिऱ्हॉसिस होऊ शकतो. या मुलीची प्रकृती सातत्याने ढासळत चालल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. अशा परिस्थितीत विकाराचे निदान ९० दिवसांच्या आत झाल्यास शस्त्रक्रियेचा पर्याय वापरता येतो. मात्र, या बाळाच्या बाबतीत निदान बाळाच्या जन्माला तीन महिने उलटून गेल्यानंतर झाल्यामुळे यकृत प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय उरला होता.
मुंबईतील परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमधील पेडिअॅट्रिक यकृत प्रत्यारोपण सर्जन डॉ. अनुराक श्रीमाळ म्हणाले, “इप्साला बायलिअरी अट्रेशियाचा विकार होता. ही अवस्था क्वचितच म्हणजे दर २००० मुलांमागे एका मुलात आढळते. मात्र, इप्साच्या केसमध्ये तिचे वय ९० दिवसांहून अधिक झाल्यानंतर या अवस्थेचे निदान झाले. त्यामुळे बीएसाठी केली जाणारी व यकृत प्रत्यारोपणाला पर्याय असलेली कसाय पोर्टोएण्टेरोस्टोमी प्रक्रिया करणे कठीण होते. म्हणजेच, वेळेत यकृताचे प्रत्यारोपण करणे हा बाळाला वाचवण्यासाठी उपलब्ध असलेला एकमेव पर्याय होता.”
मुंबईतील परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमधील पेडिअॅट्रिक हेपॅटोलॉजिस्ट डॉ. विभोर बोरकर म्हणाले, “इप्सा मोठी होत होती तसा तिचा आजारही वाढत होता. तिला कावीळ होती, अस्काइट्स (पोटात पाणी) झाले होते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तिची वाढ थांबली होती. सर्वोत्तम उपचार करूनही तिची स्थिती खालावत होती. सतत रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याने तिला अनेक प्रकारचे प्रादुर्भाव झाले होते.”
डॉ. श्रीमाळ पुढे म्हणाले, “इप्सावर जून २०१९ मध्ये यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. ५ किलोंहून कमी वजनाच्या बाळांचे यकृत प्रत्यारोपण ही सर्वांत आव्हानात्मक शस्त्रक्रियांपैकी एक आहे. छोट्या बाळांच्या रक्तवाहिन्या खूप छोट्या असतात आणि प्रत्यारोपित यकृताला त्या जोडण्यासाठी खास कौशल्य लागते. ही जटील शस्त्रक्रिया जवळपास शून्य रक्तस्रावासह पार पडली. तिला संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान केवळ ३० मिलि रक्त द्यावे लागले. त्या छोट्या बाळाची शस्त्रक्रियोत्तर काळजी घेणे शस्त्रक्रियेइतकेच आव्हानात्मक होते. कारण अशा परिस्थिती काटेकोर असेप्सिस व प्रत्येक तपशिलाकडे लक्ष देणे अत्यावश्यक असते.”
ती शस्त्रक्रियेनंतर चांगली बरी झाली आणि तीन आठवड्यांत तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर तिची कावीळ हळुहळू नाहीशी झाली आणि ती अधिक खेळकर, सजग झाली. तिच्या वयाच्या बाळांचे विकासविषयक निकषही ती पूर्ण करू लागली आहे.
मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तळवलीकर याप्रसंगी म्हणाले की, यकृत प्रत्यारोपण पथक खूप मेहनतीने तयार करण्यात आले आहे. डॉक्टर्स, सर्जन्स, परिचारिका, भूलतज्ज्ञ, इंटेन्सिव्हिस्ट्स आणि संबंधित सहाय्यक कर्मचारी यांची सर्वसमावेशक व स्पेशलाइझ्ड टीम बांधण्यात आली आहे. आजाराच्या मूल्यमापनापासून ते शस्त्रक्रियोत्तर पुनर्वसनापर्यंत प्रत्येक बाबीत रुग्णाला सर्वोत्तम सेवा देण्यासाठी ही टीम अविश्रांत काम करत आहे. ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया करण्यापासून ते शस्त्रक्रियोत्तर काळात बाळाला प्रादुर्भावांपासून जपण्यापर्यंत सर्वच आघाड्यांवर यकृत प्रत्यारोपण टीमने प्रशंसनीय कामगिरी केली आहे. अशा पद्धतीने आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत यशस्वी यकृत प्रत्यारोपण कार्यक्रम स्थापन करू शकलो आहोत. डेडिकेटेड पेडिअॅट्रिक यकृत प्रत्यारोपण सेवा सातत्याने देणारा हा एकमेव कार्यक्रम आहे.
इप्साच्या आई सौ. सुचित्रा वलवी म्हणाल्या की, मी एका सुंदर मुलीला जन्म दिला हे मला समजले तेव्हा खूप आनंद झाला होता पण माझा आनंद फार काळ टिकला नाही. बाळाला कावीळ झाली आणि तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. तिला क्वचित आढळणारा प्राणघातक यकृताचा आजार आहे व यकृत प्रत्यारोपण आवश्यक आहे असे निदान झाल्यावर तर आम्ही खूपच दु:खी झालो. आमच्या बाळाला तीव्र वेदना भोगताना बघून आईवडील म्हणून आम्हाला खूप वाईट वाटत होते. मात्र, ग्लोबल हॉस्पिटलने आम्हाला आशेचा किरण दाखवला आणि इस्पाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणले. आम्ही सर्व डॉक्टर्सचे आणि विशेषत: इप्साची मावशी कृपाली हिचे आभार मानतो. इप्साला नवीन आयुष्य देण्यासाठी कृपाली पुढे आली.