गडचिरोलीतील मार्कंडेश्वर मंदिर रात्री 9 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले
नवी दिल्ली, दि.29/7/2019 : विदर्भाचे खजुराहो अशी ओळख असणारे गडचिरोली जिल्हयाच्या चामोर्शी तालुक्यातील प्रसिध्द मार्कंडेश्वर मंदिर आता सुर्योदयापासून रात्री 9 वाजेपर्यंत भाविक व पर्यटकांसाठी खुले राहणार असल्याची माहिती, केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हाद पटेल यांनी दिली.
श्री पटेल यांनी आज देशातील 10 ऐतिहासिक वास्तू दर्शनाच्या वेळत वाढ केल्याची घोषणा केली. देशातील या ऐतिहासिक वास्तु दर्शनाचा लाभ देश-विदेशातील पर्यटकांना जास्तीत-जास्त वेळ घेता यावा या उद्देशाने वास्तू दर्शन वेळेमध्ये वाढ करण्यात आली आहे. चिन्हीत 10 ऐतिहासिक वास्तू दर्शनाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 हून वाढवून सुर्योदयापासून रात्री 9 वाजेपर्यंत करण्यात आल्याचे श्री. पटेल यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
महाराष्ट्रातील मार्कंडेश्वर मंदिरासह ,ओडिशातील राजराणी मंदिर परिसर, मध्यप्रदेशातील खजुराहो येथील दुल्हादेव मंदिर,हरियाणातील ‘शेखचिल्ली मकबरा’, दिल्लीतील ‘हुमायूँ मकबरा’ आणि ‘सफदरजंग मकबरा’, कर्नाटकातील ‘पट्टडक्कल वास्तु समूह’आणि ‘गोल घुमट’, उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ‘मान महल वेधशाळा’ आणि गुजरात राज्यातील पाटन येथील ‘राणीची वाव’ या 10ऐतिहासिक वास्तुंचा समावेश आहे.