आमदार लांडगेंनी साधला ‘दिव्यांग योग’
भोसरी : जागतिक योग दिन देशभरात साजरा होत असताना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आगळा-वेगळा उपक्रम राबविला. सुमारे एक हजार दिव्यांगांना मुंबई दर्शन घडवत त्यांच्यासोबत जागतिक योग दिन साजरा केला.
आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस् क्लब, दिव्याज फाउंडेशन आणि शिवांजली महिला प्रतिष्ठान यांनी एकत्रित येत या कार्यक्रमाची आखणी केली होती. दोन दिवसीय उपक्रमात काल (दि. 20) एक हजार दिव्यांग बांधवांना मुंबईचे दर्शन घडविण्यात आले. त्यानंतर आज (शुक्रवारी) योगदिनी मुंबई येथे विशेष सोहळा आयोजित केला होता. यामध्ये योगाचे सादरीकरण, मार्गदर्शन तसेच उल्लेखनीय कामगिरी करणार्या दिव्यांगांचा गौरव असा हा भव्य-दिव्य सोहळा होता. दिव्यांगांना ‘मोटिवेशनल’ प्रशिक्षण देण्यात आले. अभिनेते सुनील शेट्टी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, पूजा लांडगे, मंगलप्रकाश लोढा, दीपा मल्लिक आदी मान्यवर उपस्थित होते. पिंपरी-चिंचवडमधून 20 बसमधून दिव्यांगांना मुंबई दर्शन घडविण्यात आले. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे दिव्यांग भारावले होते.
अभिनेते सुनील शेट्टी म्हणाले की, दिव्यांग मुलांची काहीतरी करण्याची धडपड ही आपल्यासारख्या सामान्य लोकांना सकारात्मक ऊर्जा देत असते. एक कुस्तीपटू असणारे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या शहरातील एक हजार दिव्यांग मुलांना मुंबई दर्शन घडविले. तसेच मुंबईत अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला आणि या सोहळ्याचा एक भाग मला बनता आले, याचे खूप समाधान वाटते. भविष्यात या उपक्रमाला सहकार्य करायला मला नक्की आवडेल, असा शब्दही त्यांनी दिला.
अमृता फडणवीस म्हणाल्या की, आमदार महेशदादा हे नेहमीच अभिनव उपक्रम राबवितात. दिव्यांग मुलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण पेरण्याचे काम त्यांनी यानिमित्ताने केले आहे. हा सोहळा कायमच स्मरणात राहील. दिव्यांगांना आयुष्यात उभे राहण्यासाठी मदतीचा हात देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. दिव्याज फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग, निराधार मुलांसाठी काम करता येत असल्याचे समाधान वाटते, असेही त्या म्हणाल्या.
महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग मुलांना मुंबई दर्शन घडवायचे, हे खूप दिवसांपासून मनात होते. त्यासाठी आम्ही मुलांना घेऊन मुंबईत आलो. दुसर्याच दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन असल्यामुळे अमृताताई फडणवीस यांनी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये सहभागी होऊन आम्हाला मुंबईत योग दिन साजरा करता आला. दीपा मलिक यांनी मुलांना जे मौलिक मार्गदर्शन केले, ते त्यांच्या भावी आयुष्यात नक्की उपयोगी पडेल.