दुष्काळग्रस्तांसाठी पुण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून देणगी पक्षाच्या वेल्फेअर ट्रस्टकडे दिला दहा लाखाचा निधी
मुंबई दि. १५ (प्रतिनिधी) – राज्यातील दुष्काळ निवारण आणि भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडे दहा लाखाचा निधी सुपूर्द केला.
मुंबई येथे झालेल्या बैठसमयी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्याकडे हा निधी देण्यात आला. पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
राज्यात सध्या भीषण दुष्काळ आणि अनेक गावांत तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे स्वतः राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा करून दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. इतकेच नाही, तर पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी पाणी वाटप, चारा तसेच धान्य वाटप केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी पक्षाचे पुणे महानगर पालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये पक्षाकडे दहा लाखाचा निधी दिला.