न्यायालय आणि वकिलांच्या मागण्यांसाठी आमदार महेश लांडगे आग्रही

Share this News:

पिंपरी, 9 ऑक्टोबर – पिंपरी-चिंचवड अॅडवोकेट्स बार असोसिएशनने आमदार महेश लांडगे यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी न्यायालयासाठी आणि वकिलांच्या विविध मागण्यांसाठी मागील पाच वर्षात आग्रही भूमिका घेतल्याचे उपस्थितांनी सांगितले.

 

पिंपरी-चिंचवड अॅडवोकेट्स बार असोसिएशनच्या कार्यालयात झालेल्या बैठकीसाठी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सूनील कडुसकर, माजी अध्यक्ष अॅड. सुभाष चिंचवडे, अॅड. उत्तमराव चिखले, अॅड. सतीश गोरडे, अॅड. संजय दातीर पाटील, अॅड. विलास कुटे, अॅड. अतीश लांडगे, अॅड. जिजाबा काळभोर, अॅड. राजेश पुणेकर, अॅड. किरण पवार, अॅड. अनिल शिंदे, अॅड. गोरख कुंभार, अॅड. अंकुश गोयल, अॅड. महेश टेमगिरे, अॅड. देवराम ढाळे, अॅड. प्रकाश मेंगळे, अॅड. दत्ता झूळुक, अॅड. अतुल लांडगे, अॅड. राकेश अकोले, अॅड. राजू माधवने, अॅड. सविता रणदिवे, अॅड. सुप्रिया केंदळे, अॅड. दीपाली काळे, अॅड. सुजाता बिडकर आदी उपस्थित होते.

 

अध्यक्ष अॅड. सुनील कडूसकर म्हणाले, मागील पाच वर्षाच्या काळात आमदार महेश लांडगे यांनी उत्तम काम केले आहे. न्यायालयाच्या इमारतीसाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. तसेच बार असोसिएशनला त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी सहकार्य देखील केले आहे.

 

ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. जिजाबा काळभोर म्हणाले, आजवरच्या राजकीय इच्छाशक्तीमुळे न्यायालयाचे काम रखडले आहे. त्यामुळे बार असोसिएशनने सर्वानुमते आगामी विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. आमदार महेश लांडगे यांनी सर्व वकिलांना विश्वास दिल्यास त्याबाबत चर्चा करून पुन्हा मत प्रक्रियेत सहभागी होणार असल्याचेही ते म्हणाले.

 

अॅड. सतीश गोरडे म्हणाले, पिंपरी न्यायालयासाठी 1989 पासून जागेची मागणी केली आहे. काही काळानंतर जागेची मागणी पूर्ण झाली, मात्र इमारत नसल्यामुळे पुन्हा न्यायालयाचे काम रखडले. इमारतीचे बांधकाम करण्यासाठी बार असोसिएशनने आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली. त्यांनी न्यायालयाचा प्रश्न समजून घेतला बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाचे राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याशी भेट घडवून दिली.

 

पिंपरी न्यायालयासाठी आठ ते दहा मजली इमारत बांधण्यात येणार आहे. मात्र, या इमारतीचे काम टप्प्याटप्प्यात होणार असून सुरुवातीला चार मजली इमारत सुरू करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. बार असोसिएशनसाठी जागेची कमतरता असल्याचे आमदार महेश लांडगे यांच्या लक्षात येताच त्यांनी महापालिकेकडून 25 हजार चौरस फुटांची जागा उपलब्ध करून दिली. त्यात फर्निचरसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी देखील मिळवून दिला, असेही गोरडे म्हणाले.

 

अॅड. अतिश लांडगे म्हणाले, वकिलांच्या समस्येसाठी विधानसभेत लक्षवेधी मांडणारे आपले आमदार महेश लांडगे आहेत. पिंपरी न्यायालयात सध्या पाच कोर्ट सुरू असून नवीन इमारतीमध्ये 85 कोर्ट सुरू होणार आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयात काही तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. उच्च न्यायालयातील तांत्रिक बाबींची पूर्तता होतात महाराष्ट्र शासनाकडून निधी आणि अन्य प्रकारच्या मदतीसाठी आमदार महेश लांडगे सक्रीय प्रयत्न करणार असल्याचा विश्‍वास असल्याचेही ते म्हणाले.

 

महेश लांडगे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड अॅडवोकेट्स बार असोसिएशनचा मतदान न करण्याचा निर्णय लोकशाहीला घातक ठरेल. लोकशाहीच्या बळकटीसाठी आपण सर्वांनी मतदान करावे. आपल्या मागण्यांसाठी मी कधीच नाही म्हटले नाही. काम दाखवून मत मागणारा मी उमेदवार आहे. न्यायालयाच्या जागेला सुरक्षा भिंत बांधली. बार असोसिएशनच्या जागेसाठी प्रयत्न केले. न्यायालयाच्या कामासाठी उच्च न्यायालयाच्या काही परवानग्या लागत आहेत. न्यायालयाच्या कोणत्याही कामात आजवर मी कधी हस्तेक्षेप केला नाही. बार असोसिएशनच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. उच्च न्यायालयाच्या परवानग्या मिळाल्यास महाराष्ट्र शासनाच्या वतीने पूर्ण सहकार्य होणार आहे. सर्व वकिलांनी मतदानावर बहिष्कार न टाकता लोकशाहीचा हक्क बाजावण्याची विनंती देखील केली.