कामगार व शिवसेनेची ताकद आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी : इरफान सय्यद

Share this News:

पिंपरी (9 ऑक्टोबर 2019) : भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्या पाठीशी माथाडी, जनरल, बांधकाम कामगारांबरोबरच असंघटीत क्षेत्रातील कामगारांची व शिवसेनेची ताकद उभी करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे भोसरी व खेड सहसंपर्कप्रमुख व कामगार नेते इरफान सय्यद यांनी येथे केले.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ निगडी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत सय्यद बोलत होते. आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, किसन बावकर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार लांडगे यांचा कामगार नेते इरफान सय्यद यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सय्यद म्हणाले की, पिंपरी चिंचवड ही उद्योगनगरी आहे. पोटापाण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक शहरात आले आहेत. या कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही केला आहे. मी कामगार क्षेत्रात माथाडी, जनरल, बांधकाम कामगारांबरोबरच असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी काम करत आहे. ही ताकद आमदार लांडगे यांच्या पाठीशी उभी करणार आहे. मी स्वत: भोसरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून इच्छुक होतो. मात्र, महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला, मी पक्षाचा आदेश पाळणारा असल्याने हा निर्णय मान्य केला. आजवर पक्षाने मला भरपूर पद दिली आहेत. आमदारकीचे स्वप्नही भविष्यात निश्चित पूर्ण होईल, असे सय्यद म्हणाले. लोकसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे आणि संपूर्ण भाजपने महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना भोसरीतून 38 हजारांचे मताधिक्य दिले होते. त्यामुळे यावेळी आमदार लांडगे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे. त्यासाठी प्रभागवाईज आजी, माजी पदाधिकारी व शिवसैनिकांच्या साथीने एक भक्कम फळी आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी उभी करून देऊ, असे इरफान सय्यद यांनी सांगितले. आमदार लांडगे मला लहान बंधू मानतात ज्या प्रमाणे श्रीरामांचे लहान बंधू लक्ष्मण यांनी अखेरपर्यंत श्रीरामांची साथसोबत केली. त्याप्रमाणे मीही त्यांचा एक लहान बंधू या नात्याने यापुढे आमदार लांडगे यांच्या बरोबर त्यांची सावली बनून राहिन. या निवडणुकीत युती धर्माचे पालन करून आमदार लांडगे यांना एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळवून देऊ, असा निर्धार सय्यद यांनी व्यक्त केला.

राज्यात शिवसेना भाजप युतीची सत्ता पुन्हा आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावेत. आपआपसातील मतभेद दूर करून कामाला लागावे, असे आवाहन इरफान सय्यद यांनी यावेळी केले.