महापारेषण कंपनीच्या १३२ कि व्हो भूमिगत वाहिनी नादुरस्त झाल्याने पुण्याला फटका

Share this News:

 पुणे दि. २७ जुलै २०१९ : महापारेषण कंपनीच्या १३२ कि व्हो. जी.आय.एस. रास्तापेठ उपकेंद्राला वीजपुरवठा करणा-या भूमिगत वाहिनीत आज सकाळी ११.१० वाजता तांत्रिक बिघाड झाल्याने पुणे शहरातील जवळपास दिड लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. या तांत्रिक बिघाडाचा फटका महावितरणच्या ६ उपकेंद्रांना बसला. मात्र पर्यायी व्यवस्थेच्या सहाय्याने दुपारपर्यंत ब-याच भागाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले.

प्राप्त माहितीनुसार महापारेषण कंपनीच्या १३२ कि व्हो. जी.आय.एस. रास्तापेठ उपकेंद्राला वीजपुरवठा करणारी वाहिनी नादुरस्त झाल्याने या उपकेंद्राचा वीजपुरवठा ठप्प झाला. त्यामुळे पुणे शहरातील रास्तापेठ, कसबा पेठ, आदि पेठासह सर्व पेठांचा मध्यवर्ती परिसर तसेच लुल्लानगर, कोंढवा, गुलटेकडी, कॅम्प, स्वारगेट, मंडई, लक्ष्मी रोड, सिंहगड रोड, मार्केट यार्ड, ससून इस्पितळ परिसर या भागाचा खंडित झालेला वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्याचे महावितरणकडून युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले. दुपारी दीड वाजेपर्यंत जवळपास ९० टक्के ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. उर्वरित ग्राहकांचा वीज पुरवठा संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरळीत करण्यात आला.

दरम्यान १३२ कि व्हो वाहिनीच्या दुरुस्तीसाठी महापारेषणकडून प्रयत्न सुरु झाले तरी या कामास ४ दिवसाचा कालावधी लागणार आहे, असे महापारेषणकडून सांगण्यात आले आहे. या कालावधीत १३२ कि व्हो रास्तापेठ जी.आय.एस. उपकेंद्र बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्थेतून विजेचे भार व्यवस्थापन करावे लागणार आहे. वेळेवर उद्भवणा-या त्रांत्रिक अडचणीमुळे काही भागात नाइलाजाने तात्पुरते भारनियमन करावे लागेल.

सुमारे दीड लाख ग्राहकांना होणारा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तेंव्हा या परिस्थितीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.