निवेदिता माने, गुणाबाई जानकर, उर्मिला आगरकर यांना आदर्श माता पुरस्कार जाहीर

Share this News:

पुणे, 29/8/2019 : डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ॅण्ड एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने दुसरा आदर्श माता पुरस्कार खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री निवेदिता माने, कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जानकर आणि आगरकर परिवारातील उर्मिला आगरकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. शनिवार, दिनांक ३१ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता न-हे येथील जाधवर इन्स्टिटयूटच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी दिली.

पुरस्कार वितरण सोहळ्याला व्याख्यात्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, पत्रकार ज्ञानदा कदम, प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराचे यंदा दुसरे वर्ष असून संस्थेच्या सुरेखा सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, लहानपणापासून केलेले संस्कार, योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन यामुळे प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठू शकतो. मात्र, त्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे त्यांच्या आईचे अमूल्य योगदान असते. त्यामुळे समाजातील अशाच यशस्वी व्यक्तींच्या मातांचा सन्मान संस्थेतर्फे केला जाणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.