पर्यटकांना थेट शेतात जाऊन आंबे खाण्याबरोबरच ती खरेदी करण्याची संधी, 7 जूनपासून जुन्नर आंबेगाव आंबा महोत्सव
मुंबई, दि. 3 जून : ज्यांना थेट शेतात जाऊन आंबे खाण्याबरोबरच ती खरेदी करायचे आहेत, अशा खवय्या कृषी पर्यटनप्रेमींसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने “जुन्नर आंबेगाव आंबा महोत्सव – 2019″चे आयोजन केले आहे. 7, 8, 9 जून तसेच 15 आणि 16 जून रोजी हा आंबा महोत्सव जुन्नर आणि आंबेगाव परिसरात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
कोकणातील रत्नागिरी, देवगड हापूस आंबा देशात नाही तर जगात प्रसिद्ध आहे. कोकणातील आंब्याप्रमाणेच जुन्नर, आंबेगाव (जि. पुणे) परिसरातील आंबा चविष्ट आहे. इथले प्रदूषण मुक्त वातावरण, माळशेजच्या पर्वत रांगातील नैसर्गिक शेती, शुद्ध पाणी यामुळे या परिसरातील आंब्याला वेगळी चव, आकार, रंग, रूप, सुगंध आहे. हा आंबा खवय्यांपर्यंत पोहचावा यासाठी पर्यटन विभागाने या आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे.
जुन्नर आंबेगाव आंबा महोत्सव इतर सर्वसाधारण आंबा महोत्सवांसारखा नाही. या महोत्सवात शेतकरी ग्राहकांकडे जाणार नाहीत तर ग्राहकच थेट शेतकऱ्याच्या शेतात जातील. आंबा बाग कशी असते, आपण खातो तो आंबा कसा पिकवतात, आंब्याचे प्रकार कुठले याची माहितीही ग्राहक घेतील. या पर्यटक ग्राहकांना शेतशिवारात ग्रामीण जेवणाचा, कृषी पर्यटनाचा आनंदही घेता येणार आहे. त्यामुळे पर्यटकांनी या महोत्सवात सहभागी होऊन कृषी पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पर्यटनमंत्री श्री. रावल यांनी केले आहे.
जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री, गिरवली तर आंबेगाव परिसरातील भीमाशंकर, शिणोली, पिंपळगाव, गंगापूर या गावातील शेतांमध्ये हा आंबा महोत्सव भरवण्यात येतो आहे. महोत्सव यशस्वीतेसाठी पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, वरिष्ठ व्यवस्थापक क्षिप्रा बोरा प्रयत्नशील आहेत. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ७७६८०३६३३२ / ८६००८८०१११ / ९९६७१०२७०३ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.