खडकवासला भागात ‘वायसीएम’ प्रमाणे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय व्हावे : सुप्रिया सुळे यांचे महापालिकेस निवेदन

Share this News:

पुणे, दि. ३ (प्रतिनिधी) – वाढती लोकसंख्या आणि आरोग्याचे प्रश्न विचारात घेता खडकवासला विधानसभा मतदार संघामध्ये वायसीएम प्रमाणे मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाची गरज आहे. त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होण्यासाठी पुणे महापालिकेने सहकार्य करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना याबाबत निवेदन देत सुळे यांनी लवकरात लवकर याबाबत कार्यवाही व्हावी अशा सूचना दिल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यावेळी उपस्थित होते.

धनकवडी ते खडकवासला आणि पुढे उत्तमनगर, वारजे तसेच नऱ्हे आंबेगाव, धायरी परिसर, पानशेत या भागात गेल्या काही वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. एकेकाळची उपनगरे मोठमोठ्या सोसायट्यांनी गजबाजून गेली आहेत. याशिवाय ठिकठिकाणाहून स्थलांतरित झालेला कामगार वर्गही या भागात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे.

इतक्या मोठ्या संख्येने राहणाऱ्या या भागातील गोरगरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकंसाठी अल्पदरात अत्याधुनिक आरोग्यसेवा देणारे शासनाचे मोठे रुग्णालय असणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड भागातील यशवंतराव चव्हाण स्मृति (वायसीएम) रुग्णालयाप्रमाणे मोठे आणि मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभे रहावे. यासाठी महापालिकेने सहकार्य करावे, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भात त्यांनी दिलेल्या निवेदनास निंबाळकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्या म्हणाल्या.

परवानगी नसल्यास कात्रजचा सीएनजी पंप बंद करा

कात्रज डेअरीच्या मागे असलेल्या सीएनजी पंपामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. वास्तविक येथे डीपी रस्ता नसताना या पंपाला तांत्रिक मान्यता कशी दिली, असा प्रश्न स्थानिक नगरसेविका अमृता बाबर यांनी उपस्थित केला. त्यावर परवानगी नसेल तर तातडीने तो पंप बंद करावा, अशी सूचना सुप्रिया सुळे यांनी निंबाळकर यांना केली. यबरोबरच प्रभाग क्रमांक ४० मधील डीपी रस्ता, संतोषनगर भाजी मंडई मधील अतिक्रमण, धायरी भागातील पाणी प्रश्न, शिवणे ते खराडी रस्त्याचे काम आदी विषयांवर यावेळी चर्चा करून लवकरात लवकर हे प्रश्न सोडवावेत, अशी सूचना सुळे यांनी यावेळी केली.