चित्रपटगृहात ‘Once मोअर’

Share this News:

प्रत्येक नात्याची एक गंमत असते… त्यातही नवरा बायकोचं नातं हे अतिशय अनाकलनीय असतं. कधीच एकमेकांना पाहिलेले नसताना सुद्धा लग्नानंतर जन्मभर एकमेकांसोबत तितक्याच आत्मीयतेने रहायचं. वेळोवेळी कसोटीचे कठीण क्षण ही येतात. नवरा-बायकोच्या नात्यातील रुसवा-फुगवा, अनामिक ओढ दाखवतानाच दोन युगांमधील माणसे कशी एकमेकांशी जोडली गेली असतील. त्याच्यातील संबंध, सामायिक धागा उलगडून दाखवणारा ‘Once मोअर हा चित्रपट १ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

‘Once मोअर ही गोष्ट आहे आपल्या सगळ्यांची…. नात्यातला गुंता अलगद सोडून आयुष्यात गंमत आणायची. ‘लॉजिकल जगातील मॅजिकल गोष्ट’….‘कर्म’ अधोरेखित करताना कपिल आणि अंजली या जोडप्याची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. एका रहस्याचा उलगडा झाल्यानंतर या जोडप्याच्या आयुष्यात नेमका काय बदल होणार? या बदलाला ते कसे सामोरे जाणार ? याची रंजक कथा ‘Once मोअर’ या चित्रपटात उलगडणार आहे.

छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांच्या माध्यमातून भेटीला आलेले दिग्दर्शक-अभिनेता नरेश बिडकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘Once मोअर हा पहिला चित्रपट आहे. आजवर नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी या चित्रपटासाठी वेगळ्या भूमिकेचं शिवधनुष्य पेललं आहे. आजोबाच्या पुरुषी रूपात त्या आपल्याला दिसणार आहेत. ज्येष्ठ बल्लवाचार्य विष्णू मनोहर या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनय क्षेत्रात पदार्पण करताहेत. तसेच या चित्रपटाच्या निर्मितीची धुराही त्यांनी सांभाळली आहे.

रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, विष्णू मनोहर, नरेश बिडकर आदि सिनेसृष्टीतील अनुभवी कलाकारांसोबत आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी हे दोन नवे चेहरे चित्रपटात दिसणार आहेत.

वंशिका क्रिएशन, देवस्व प्रोडक्शन तसेच लवंदे फिल्म व विष्णू मनोहर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचे लेखन श्वेता बिडकर यांनी केले आहे. धनश्री विनोद पाटील, सुहास जहागीरदार, निलेश लवंदे विष्णू मनोहर आणि डॉ. विनित बांदिवडेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभय ठाकूर, सुदिप नाईक, संपदा नाईक आणि व्ही.टी एच.एटंरटेन्मेंट सहनिर्माते आहेत.शैलेंद्र बर्वे यांनी संगीताची तर सौरभ भालेराव यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी सांभाळली आहे. स्वप्नील बांदोडकर, नकाश अजिज, हमसिका अय्यर या गायकांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. छायांकनाची संजय सिंग तर संकलनाची जबाबदारी निलेश गावंड यांनी सांभाळली आहे. कलादिग्दर्शन देवदास भंडारे यांचे असून नृत्यदिग्दर्शन चिन्नी प्रकाश,संदेश चव्हाण, श्वेता-तेजस यांचे आहे. चैत्राली डोंगरे वेशभूषा तर रंगभूषा श्रीनिवास मेनगु यांची आहे. प्रोस्थेटिक मेकअप रमेश मोहंती, कमलेश गोथिडे यांनी केला आहे. साहस दृश्याची जबाबदारी प्रशांत नाईक यांनी सांभाळली आहे.

१ ऑगस्टला ‘Once मोअर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.