राम जेठमलानी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Share this News:

नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2019 : ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

“श्री राम जेठमलानी यांच्या निधनामुळे, भारताने एक निष्णात वकील आणि न्यायसंस्था तसंच संसदेत मोठे योगदान देणारी मान्यवर व्यक्ती गमावली आहे. ते कुशाग्र बुद्धीचे, निर्भय आणि आपली मते परखडपणे मांडणारे व्यक्ती होते.

त्यांच्या मनात जे विचार असतील, ते स्पष्टपणे, कोणालाही न घाबरता व्यक्त करत असत. आणिबाणीच्या अंधारयुगात त्यांनी ज्या धैर्याने व्यक्तीस्वातंत्र्यासाठी लढा दिला, ते सदैव लक्षात राहील. गरजूंना मदत करणे, हा त्यांच्या स्वभावाचा स्थायीभाव होता.

राम जेठमलानी यांच्यासोबत विविध प्रसंगी चर्चा करण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. आज, त्यांच्या निधनाच्या दुःखद प्रसंगी, त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांप्रति मी शोकसंवेदना व्यक्त करतो. ते आज आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य आपल्याला कायम प्रेरणा देत राहील. ओम शांती !” असे पंतप्रधानांनी म्हंटले आहे.