दिव्यांग सैनिकांच्या कार्याला हिंदू-मुस्लिम गणेशभक्तांचा सलाम 

Share this News:

पुणे 8/9/2019: भारत माता की जय, वंदे मातरम्च्या जयघोषाने दुमदुमून गेलेला परिसर…चौका-चौकात फुलांची होणारी उधळण… देशांतर्गत देशाची सेवा करणा-या पोलिसांनी  व्हिलचेअरवरील दिव्यांग सैनिकांना मैत्रीचा हात देत रॅलीमध्ये घेतलेला सहभाग… आणि चिमुकल्यांनी गुलाबपुष्प देत देशाच्या भविष्यासाठी प्राणाची बाजी लावणा-या सैनिकांच्या कार्याला केलेला सलाम अशा देशभक्तीच्या प्रेरणेने भारलेल्या वातावरणात सद््भावना रॅली उत्साहात पार पडली. शहराच्या पूर्वभागामध्ये हिंदू-मुस्लिम गणेशभक्तांनी एकत्र येत आजी दिव्यांग सैनिकांसमवेत सद््भाव रॅली काढून ऐन गणेशोत्सवात एकतेचा संदेश दिला.

शुक्रवार पेठेतील खडक पोलीस स्टेशन व सेवा मित्र मंडळ ट्रस्ट तर्फे सर्वधर्मिय सद्भावना रॅली काढण्यात आली. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, निवृत्त कॅप्टन चंद्रशेखर चितळे, खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, उत्तम चक्रे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, श्रीकांत अगस्ती, विष्णु ठाकूर, इसादभाई चावीवाला, मुस्ताकभाई पटेल, संदीप गायकवाड, मंडळाचे शिरीष मोहिते आदी उपस्थित होते. पोलीस सोमनाथ ढगे, सागर केकाण, इस्माईल शेख,फईम सय्यद, सचिन माळी, मंडळाचे अध्यक्ष नितीन झंझाड, अमर लांडे, अमेय थोपटे, प्रद्युम्न पंडित, विक्रांत मोहिते आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
सन्मानपत्र, उपरणे, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन क्विन्स मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट, खडकी येथील बसवराज, ज्योती शर्मा, दिलावरसिंग, अभिजीत पाटील, पवनकुमार या आजी दिव्यांग सैनिकांचा सन्मान करण्यात आला. गुरुवार पेठेतील जिव्हेश्वर हॉल पासून सुरु झालेल्या रॅलीचा समारोप शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ उत्सव मंडपात झाला. तिरंगी झेंडे, फुलांची उधळण आणि चौका-चौकात औक्षण केले.
मुक्ता टिळक म्हणाल्या, आपल्या भारतातील दोन क्षेत्रातील व्यक्तींचा अभिमान असायला हवा. शास्त्रज्ञ आणि देशाच्या सिमेवर लढणारे जवान हे देशाची प्रगती व सुरक्षेकरीता दिवसरात्र झटतात. त्यामुळे त्यांच्या योगदानाची किंमत पैशामध्ये किंवा शब्दामध्ये देखील मोजता येत नाही. त्यांच्या कार्याची आठवण प्रत्येकाने ठेवायला हवी.
कॅप्टन चंद्रशेखर चितळे म्हणाले, दिव्यांग सैनिकांसमोर आपण निवृत्तीनंतर काय करायचे, हा प्रश्न असतो. त्यांना आयुष्यात त्यांच्या पायावर उभे करुन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्याकरीता प्रयत्न होणे आवश्यक आहे. सैनिकांना अडचणीच्या काळात मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. तेच काम क्विन्स मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट सातत्याने करीत आहे.
दिव्यांग सैनिक ज्योती शर्मा म्हणाले, आयुष्यात कोणतेही संकट आले तरी आपण हिंमत सोडणे चुकीचे आहे. सैनिक कोणालाही मदत करताना, तुम्ही कोणत्या जाती-धर्माचे आहात, हे विचारत नाही. भारतीय हाच आपला धर्म असून देशासाठी काम करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यायला हवे, असेही त्यांनी सांगितले. स्वरझंकार बँड मिरवणुकीत सहभागी झाला होता. डॉ. मिलींद भोई यांनी सूत्रसंचालन केले.