पोलीस अधिकारी करतात रक्तदानाद्वारे रक्ताचे नाते जोडण्याचे काम सुर्यकांत पाठक यांचे प्रतिपादन
पुणे : सीमेवर आपल्या देशाच्या रक्षणासाठी रक्त सांडणारे सैनिक जेवढे महत्त्वाचे आहेत, तेवढेच समाजाला आवश्यक असलेल्या रक्ताचे महत्व ओळखून रक्तदान करणारे देखील महत्वाचे आहेत. समाजामध्ये सुशिक्षीत भागात रक्तदानाविषयी जागृती आहे. परंतु अनेक भागात रक्तदानाविषयी जनजागृती करण्याचे गरज आहे. रक्त कोणत्या कारखान्यात तयार होत नाही. सामाजिक कामांसाठी पोलीस सदैव सहकार्य करीत असतात. रक्तदानाच्या चळवळीतही पोलीस मागे नसून रक्तदानाद्वारे रक्ताचे नाते जोडण्याचे काम ते करीत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुर्यकांत पाठक यांनी केले.
झंवर परिवारातर्फे रामेश्वर झंवर आणि पुष्पाबाई झंवर यांच्या स्मरणार्थ शंकरशेठ रस्त्यावरील ओसवाल बंधू कार्यालय येथे रक्तदान महाशिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी सर्वाधिक वेळा रक्तदान करणा-या पोलीस अधिका-यांना आस्वाद जीवनदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राम बांगड, जुगलकिशोर पुंगलिया, जुगलकिशोर मालू, आयोजक शाम झंवर, गणेश झंवर, कैलास झंवर उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय धोपावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, पोलीस उपनिरीक्षक एस. एम. क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, येरवडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांना आस्वाद जीवनदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह आणि तुळशीचे रोप, शाल असे पुरस्काराचे स्वरुप होते.
विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, काका धर्मावत, डॉ.सतीश देसाई, माजी आमदार मोहन जोशी, रवींद्र धंगेकर, सदाशिव कुंदेन, दिपाली पांढरे यांसह विविध मान्यवरांनी दिवसभरात रक्तदान शिबीराला भेट दिली.
राम बांगड म्हणाले, उन्हाळ्यामध्ये डिहायडेÑशनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे माणसाच्या शरीरात अनेक गोष्टींची कमतरता जाणवत असते. त्यामुळे एप्रिल, मे, जून या महिन्यांमध्ये अधिकाधिक रक्तदान शिबिरे घ्यावी. रक्तदाते वाढविणे आणि त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न दरवर्षी झंवर परिवारातर्फे केला जातो.
धनंजय धोपावकर म्हणाले, चांगल्या कार्याची सुरुवात रक्तदान, नेत्रदान, अवयवदान या गोष्टींमुळे होते. आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो त्यामुळे हे महत्वाचे कार्य आहे. वैशाली चांदगुडे म्हणाल्या, महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे महिलांनी देखील मोठ्या प्रमाणावर रक्तदान करणे आवश्यक असून याद्वारे त्यांचे आरोग्य उत्तम राहील. एस.एम. क्षीरसागर म्हणाल्या, रक्तदान हे एकप्रकारे जीवनदान आहे. जे रक्तदान करू शकतात ते खूप भाग्यवान आहेत.
शाम झंवर म्हणाले, अॅनिमीयामुक्त भारत व सशक्त भारत करण्याच्या हेतून जास्तीत जास्त रक्तदात्यांना प्रेरणा देण्याचा उद्देश आहे. पोलीसांना रोज तणावाचा सामना करावा लागतो तरीदेखील आपल्या रक्ताचा एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचविण्यास उपयोग होऊ शकतो या सद्भावनेने पोलीस रक्तदान करीत असतात. इतरांना देखील यामधून प्रेरणा मिळावी यासाठी पोलीस रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला.
कैलास झंवर म्हणाले, रक्तदान शिबीरात ४९३ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. उपक्रमात सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन आपला सहभाग दर्शविला. यामध्ये लायन्स क्लब आॅफ पुणे किरकी व यशोधन तिरुपती नागरी सहकारी पतसंस्था, पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ युवा समिती, अलायांस क्लब आॅफ पुणे, रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट, निर्मिती फाऊंडेशन, मैत्रीचे नाते ट्रस्ट, श्री बालाजी भजनी मंडळ, राधाकृष्ण मंदिर युवा समिती या संस्थांनी सक्रीय सहभाग घेतला. अभय जाजू यांनी सूत्रसंचालन केले.