प्राधान्याच्या कामांसाठी जिल्हा परिषदेला तातडीने निधी उपलब्ध करून देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे दि. ५ : जिल्ह्यासाठी तातडीने आणि प्राधान्याने आवश्यक असणाऱ्या कामांची यादी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी एकत्रितपणे तयार करुन तसा प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्याच्या सूचना देत अशा प्राधान्याच्या कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे जिल्हा परिषदेला भेट दिली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात त्यांनी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते-पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, स्थायी समितीचे सदस्य शरद बुट्टे-पाटील, सदस्य नितीन मराठे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा व रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी आवश्यक असणाऱ्या निधीची मागणी तातडीने नोंदवावी, या मागणीचा प्राधान्याने विचार करून जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक असणारा निधी देण्यात येईल. तसेच जिल्ह्यात सध्या तातडीच्या आणि प्राधान्याच्या कामाची यादी व प्रस्ताव पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून तयार करावा, तो तातडीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवून द्यावा, या कामांसाठी आवश्यक निधीची उपलब्धता करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्य शासनाकडे असणारी मुद्रांक शुल्क बाकी, टंचाई आराखडा, जिल्ह्यात सुरू असणारे पाण्याचे टँकर, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सुरु असणाऱ्या जिल्ह्यातील १२ कामांच्या प्रगतीचा आढावा, पालखी सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपाययोजना, ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन, महराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान कार्यक्रम आदी कामांचा आढावा पालकमंत्री यांनी घेतला.
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांनी सादरीकरण केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.