पुणे : प्राण्यांवरील उपचाराकरिता श्रीमद राजचंद्र अॅनिमल नर्सिंग होमचे उद्घाटन

पुणे, 9/9/2019 : श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर यांच्या वतीने प्राण्यांवरील उपचार आणि त्यांच्या संरक्षणाकरीता प्राणीमात्रांना समर्पित श्रीमद राजचंद्र अॅनिमल नर्सिंग होम मुंबई येथे स्थापन करण्यात आले आहे. या अॅनिमल नर्सिंग होमचे उद्घाटन पूज्य गुरुदेवश्री राकेशभाई, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल, गुजरातचे मुख्यमंत्री विजयभाई रुपानी यांच्या उपस्थितीत झाले.
पुण्यातील मुकुंदनगर भागात श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर संस्थेचे केंद्र असून तेथे या नर्सिंग होमविषयी माहिती मिळणार असून मुंबईतील प्राण्यांच्या उपचारांविषयी मदत देखील घेता येणार आहे. प्राण्यांच्या उपचाराकरीता असलेल्या या इस्पितळात आधुनिक आॅपरेशन थिएटर, हायड्रॉलिक टेबल, पॅथॉलाजी लॅब आदी अद्ययावत सुविधा आहेत. वर्षभरात २५ हजारांपेक्षा अधिक प्राणिमात्रांवर उपचार करण्याचा संस्थेचा मानस आहे. ही सुविधा मुख्यत: शेतकºयांची जनावरे आणि आणि रस्त्यावर अपघात होणाºया जनावरांसाठी आहे. याचा उद्देश प्राणीमात्रांची निस्वार्थ सेवा करणे आहे.
पीयुष गोयल म्हणाले, पशु-पक्ष्यांची काळजी घेण्यासाठी श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर यांच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या श्रीमद राजचंद्र अॅनिमल नर्सिंग होम हा अतिशय चांगला उपक्रम आहे. समाज या अभिनव उपक्रमासाठी संस्थेप्रती नेहमी कृतज्ञ राहील. यावेळी पूज्य गुरुदेवश्री राकेशभाई यांच्या भगवान महावीर के मंगलमय सिद्धात या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.