दोन दिवसांत विजेची समस्या मार्गी लावा; अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार – महेश लांडगे

Share this News:

‘पावसाळ्यामध्ये वीज खंडीत होऊ देऊ नका, नियोजन करा’

पिंपरी, 12 जून – भोसरी मतदारसंघात वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. पावसाला सुरुवात होताच वीज खंडित होण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चार-चार तास वीजपुरवठा सुरळीत होत नाही. नागरिक हैराण झाले आहेत. औद्योगिक पट्ट्यातील वीजपुरवठा खंडित होत असल्याने लघुउद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. येत्या दोन दिवसांत सर्व तक्रारींचे निराकरण करून वीजपुरवठा सुरळीत करा. अन्यथा येत्या शनिवारी भोसरी, बालाजीनगर येथील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा निर्वाणीचा इशारा आमदार महेश लांडगे यांनी दिला. तसेच भोसरीतून मोईला सुरु असलेला वीज पुरवठा तातडीने खंडित करण्याचे निर्देशही त्यांनी अधिका-यांना दिले.

भोसरी मतदारसंघातील विजेच्या समस्या संदर्भात आणि पावसाळ्यात सातत्याने होणा-या खंडित वीज पुरवठ्याबाबत महावितरणचे अधिकारी, महापालिका विद्युत विभागाच्या अधिका-यांची आज (बुधवारी) आमदार लांडगे यांनी बैठक घेतली. त्यात दोन दिवसांत विजेच्या सर्व समस्या मार्गी लावव्यात. भोसरी विधानसभा मतदार संघातील महावितरणशी संबंधित सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना लांडगे यांनी अधिका-यांना दिल्या.

भोसरीतील ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या बैठकीला महापौर राहुल जाधव, महावितरणचे पुणे जिल्ह्याचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता पंकज तगडपल्लेवार, कार्यकारी अभियंता राहुल गवारी, क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगट, ‘इ’ प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, सागर गवळी, राजेंद्र लांडगे, कुंदन गायकवाड, उत्तम केंदळे, नगरसेविका नम्रता लोंढे, माजी नगरसेवक भीमा बोबडे, स्वीकृत सदस्य दिनेश यादव, पांडुरंग भालेकर, परिक्षीत वाघेरे, लघुउद्योजक संघटनेचे सचिव जयंत कड, महापालिका विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय घुबे, प्रवीण घोडे, देशमुख उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले, ”गेल्या तीन दिवसांपासून भोसरीच्या विविध भागात वीज खंडित होण्याचा घटना घडल्या आहेत. दररोज चार-चार तास वीजपुरवठा खंडित होत आहे. परिवर्तन हेल्पलाईनवर तीन दिवसात सुमारे 500 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पावसाळ्यापूर्वीची कामे अगोदरच पूर्ण करणे अपेक्षित होते. यापुढे फांदी तुटली, ट्रान्सफॉर्म उडाला, साहित्य नाही अशी कारणे चालणार नाहीत. नागरिकांना अंधारात ठेवू नका. पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा खंडित होता कामा नाही. पावसाळ्यात दुरुस्तीच्या कामासाठी अधिकच्या कर्मचा-यांची नियुक्ती करा. पिंपरी-चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. वीज नसेल तर नागरिकांना वरच्या मजल्यावर पाणी नेता येत नाही”

“भोसरीत एमआयडीसी आहे. एमआयडीसीत अनेक लघुउद्योजक आहेत. उद्योजकांनी कर्ज काढून उद्योग सुरु केला आहे. तासभर जरी विद्युत पुरवठा खंडित झाला. तर, त्यांचे लाखोंचे नुकसान होते. सातत्याने वीज पुरवठा खंडित झाल्यास त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल. उद्योजकांकडून महावितरणला अधिकचा महसूल मिळतो. त्यासाठी वीज पुरवठा खंडित होता कामा नये याची दक्षता घेण्यात यावी. काही ठिकाणाचे ट्रान्सफर ‘ओव्हर’ लोड झाले असून ते बदलण्यात यावेत. वडमुखवाडी, दिघीगाव, काळजेवाडी, भोसरीगाव, चिखली, तळवडे, मोशीतील प्रलंबित असलेले वीज मीटर त्वरित ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात यावेत. धोकादायक वायर ‘अंडरग्राऊंड’ करण्यात याव्यात. डीपी, ट्रान्सफॉर्मर झाकून ठेवा. जेणेकरुन पावसाळ्यात कोणाचा हात लागून विजेचा धक्का बसणार नाही”, असेही आमदार लांडगे म्हणाले.

”महापालिकेतर्फे खोदाई केल्यास महावितरणची केबल तुटते. त्यामुळे विद्युतपुरवठा खंडित होतो. खोदाई करताना केबल तुटल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, अशी नोटीस महापालिकेला देण्यात यावी. पावसाळ्यात जिथे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. अशी ठिकाणी शोधा. तिथे अगोदरच दुरुस्तीची कामे करा. फांद्या तोडण्यासाठी महापालिकेची मदत लागल्यास ती मदत घेण्यात यावी. महावितरणचे कर्मचारी लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यांना योग्य ती समज देण्यात यावी. लोकप्रतिनिधींपेक्षा एजंटची कामे वेगात होतात. महावितरणमधील एजंटगिरी बंद करा, असा सूचनाही आमदार लांडगे यांनी केली.

मोईचा क्रशर मशिनचा वीज पुरवठा खंडित करा

चाकण, मोईतील खाण खोदण्यासाठी वापरण्यात येणा-या क्रशर मशिनसाठी भोसरीतील महावितरण कार्यालयातून वीजपुरवठा केला जातो. मोईकरांना वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्याची सूचना सहा महिन्यांपूर्वी दिली होती. त्यामुळे आता त्यांना दिला जाणारा वीज पुरवठा खंडित करण्यात यावा. त्यांना वीज दिली जात असल्याने कुदळवाडी, चिखली परिसरातील 50 हजार कुटुंब अंधारात जातात. त्यासाठी तातडीने मोईचा वीज पुरवठा खंडित करण्याची सूचना देखील लांडगे यांनी अधिका-यांना केली.

भोसरी विधानसभा विद्युत समितीच्या सदस्यांच्या भागातील तक्रारींचा आढावा घेण्यात आला. तसेच पूर्ण झालेली कामे व प्रस्तावित कामांचा यासह इतर प्रलंबित विषयांबाबत आमदार लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला.