कोंढवा दुर्घटना प्रकरणी मृत कामगारांना  9 लाख रुपयांचे अर्थ सहाय्य – चंद्रकांत पाटील

Share this News:

मुंबई, दि. 1 : मौजे-कोंढवा या भागात भिंत कोसळून मृत्युमुखी झालेल्या कामगारांच्या कुटूंबियांना राज्य आपत्ती निवारण निधीमधून पाच लाख रूपये आणि बांधकाम कामगार महामंडळाकडून चार लाख रुपये असे एकूण नऊ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह वायुदलाच्या विमानाने मूळगावी पाठविण्यात आले असून जखमी कामगारांवर उपचार सुरू आहेत. सदर घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत करून आठ दिवसात अहवाल मागवून अहवाला अंती दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्वारे विधानसभा आणि विधानपरिषदेत दिली.

श्री. पाटील म्हणाले, मौजे कोंढवा येथे ॲल्कॉन स्टायलस हा गृहप्रकल्प आहे. या प्रकल्पानजिक असलेली जुनी संरक्षक भिंत कोसळून दुर्घटना घडली आहे. सदर भिंतीलगत भरावामध्ये पावसाचे पाणी साठून दबाव आल्याने भिंत नजीकच्या गृहप्रकल्पाच्या कामगारांच्या निवासी कॅम्पवर कोसळली. या दुर्घटनेत १५ कामगारांचा मृत्यू झाला असून, तीन कामगारांना ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. हे कामगार बिहार येथील आहेत. जखमींवर ससून रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती श्री. पाटील यांनी निवेदनाद्वारे दिली.

जिल्हाधिकारी पुणे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देवुन घटनेची पाहणी केली आहे. सदर ठिकाणी अग्नीशमन दल पुणे मनपा,आपत्ती व्यवस्थापन कक्ष, एनडीआरएफ टिम यांनी जागेवर जाऊन शोध बचाव कार्य राबविले आहे. जागेवर कोसळलेल्या भिंतीचा मलबा हटविण्यात आलेला असून अर्धवट धोकादायक असलेली भिंत उतरवुन घेण्यात आलेली आहे.  तसेच, सदर गृहप्रकल्पालगत असलेल्या मे.कुणाल हौसिंग यांच्या प्रकल्पामध्ये विनापरवाना लेबर कॅम्प उभारल्याबाबत तसेच सदर कॅम्प असुरक्षितदृष्ट्या धोकादायक भिंतीलगत बांधल्याबाबत सदर गृहप्रकल्प तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार कारवाई करण्यात आली आहे. वास्तुविशारद विवेक अग्रवाल आणि सुनील हिंबेरे यांची पुणे महानगरपालिकेतील नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

श्री. पाटील म्हणाले, सदर घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करण्यात आले आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेणेबाबत सर्व संबंधित विभागाला सुचित करण्यात आले आहे. दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्व दोषींवर तत्काळ कार्यवाही करणेबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.