विसर्जन मिरवणुकीत रुद्रगर्जना पथकात सहभागी होणार पूरग्रस्त सांगलीतील वादक
पुणे 10/9/2019 : विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होणारी ढोल-ताशा पथके हे उत्सवाचे विशेष आकर्षण असते. ढोल-ताशा संस्कृती ही पुण्यासोबतच महाराष्ट्रातील इतर भागातही तेवढीच प्रसिद्ध आहे. यंदा सांगली आणि कोल्हापूर येथे आलेल्या पुराचा फटका तेथील पथकांना देखील बसला आहे. पुरामुळे यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याची वेळ आल्याने गेल्या अनेक महिन्यापासून पथकांनी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. त्यामुळे पुण्यातील रुद्रगर्जना पथकाने सांगलीतील पूरग्रस्त भागातील ५० वादकांना विसर्जन मिरवणुकीत वादनाची संधी उपलब्ध करुन दिली आहे.
पुण्याच्या गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूक हे खास आकर्षण असते. त्यामुळे यंदा सामाजिक बांधिलकी तसेच पथक संस्कृती जपत रुद्रगर्जना पथकाने हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. पथकातील वादक आणि व्यवस्थापक यांनी घेतलेल्या कष्टाचे मूल्य जाणत हा उपक्रम राबविण्याकरीता पुढाकार घेण्यात आला आहे. सांगली येथील सुमारे ५० वादक यंदा रुद्रगर्जना वाद्यपथकामध्ये सहभागी होऊन आपली कला सादर करतील.
मानाचा पहिला श्री कसबा गणपती तसेच नवसाचा गणपती हुतात्मा बाबूगेनू मंडळ यांच्या विसर्जन मिरवणूक मध्ये हे वादक वादन करणार आहे. पुण्यातील जगप्रसिद्ध मिरवणुकांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल सांगली येथील वादकांनी संपूर्ण पुणेकरांचे आभार मानले आहेत. तसेच मिरवणुकीत देखील हे वादक पुणेकरांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने आभार मानणार आहेत.