भोसरीतील अंतिम आरक्षणाचे प्रस्ताव पाठवा, तत्काळ निकाली काढणार – जिल्हाधिकारी

Share this News:

पिंपरी, 30 ऑगस्ट – भोसरीत विधानसभा मतदारसंघातील शासकीय गायरान जमिनी पिंपरी महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचे प्रस्ताव पाठविण्यात यावेत. आरक्षणाचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्यात येतील, असे पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले. त्यांनी भोसरीतील भूसंपादनाचे प्रस्ताव मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. याबाबतची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

आमदार लांडगे यांच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदारसंघातील शासकीय गायरान जमिनी पिंपरी महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. 29) बैठक झाली. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, उपजिल्हाधिकारी समीक्षा चंद्रकार, तहसीलदार विवेक जाधव, पिंपरी महापालिकेचे भूमी अभिलेख उपअधिक्षक शिवाजी भोसले, नगररचना विभागाचे उपअभियंता संदेश खडतरे, प्रकाश साळवी या बैठकीला उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “चिखली, दिघीतील गायराण जागा तत्काळ महापालिकेकडे हस्तांतरित करावी. दिघीतील गट नंबर 43 येथील जागा मेट्रो अथवा संरक्षण विभागाला देण्यात येवू नये. ही जागा तातडीने महापालिकेकडे हस्तांतरित करावी. सर्व प्रस्ताव तत्काळ मार्गी लावावेत”

“त्यामध्ये गट नंबर 43, दिघी, चिखली 53, च-होतीलीतील जागा प्राधान्याने महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावी. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद ठेवली आहे. आरक्षण ताब्यात आल्यास विकास कामे करता येतील. येत्या आठवड्यात मोशीतील गट नंबर 646 या गायरान जमिनीवर नियोजीत सफारी पार्क विकसित करण्यात येणार आहे. त्याकरिता पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे बैठक होणार आहे”

त्यावर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले, “संबंधित जागेवर महापालिकेचे आरक्षण असल्यास तत्काळ निकाली काढले जाईल. आरक्षण नसल्यास ते निश्चित करुन पाठविण्यात यावे. सर्व प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यात पाठविण्यात यावेत. तसेच भूसंपादन शाखेकडे दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विषयावरुन त्यांनी अधिका-यांना फैलावर घेतले. दोन दिवसात भूसंपादन यादीची भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणीसाठी वेळ घ्यावा. त्याचे नियोजन तयार करुन सादर करण्यात यावा. मोजणीसाठी जिथे अडचण येईल. तिथे पोलीस संरक्षण घेऊन विषय मार्गी लावा” या कामाला विलंब केल्यास अधिका-यांची गय केली जाणार नाही. कारवाई करण्याचा इशारा राम यांनी अधिका-यांना दिला.