किराणा सामान, दूध, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू व औषधालय वगळून शॉपींग मॉल 31 मार्चपर्यंत बंद

पुणे,दि.15- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून पुणे जिल्हयामध्ये नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हयातील सर्व शॉपींग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापनामध्ये अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय वगळून 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 नुसार 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3, व 4 मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. शासनाच्या या आदेशाची अवज्ञा करणा-या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी राम यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.