नागरिकांनी यात्रा, उत्सव, लग्न समारंभ व गर्दीची ठिकाणे टाळावीत : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे,दि.15/03/2020: सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना विषाणूसंदर्भात कोणत्याही प्रकारची अर्धवट, खोटी, चुकीची आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी माहिती पसरवू नका. असे प्रकार करणा-यांवर कार्यवाही करण्यात येईल, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याने नागरिकांनी घाबरुन जाण्याचे तसेच कोणत्याही अफवेला बळी पडण्याचे कारण नाही. नागरिकांनी यात्रा, उत्सव, लग्न समारंभ असे गर्दीची ठिकाणे टाळावीत. असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, सध्या जिल्ह्यात 15 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे 16 जणांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण हे परदेशातून आलेले वा परदेशातून आलेल्यांच्या संपर्कात आलेले होते. पण, नव्याने पाच जणांचे अहवाल आले आहेत. यातील चार जण कुठेही फिरण्यास गेलेले नव्हते. हे सर्व कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. या पाच पैकी एक जण थायलंडमधून परत आला आहे. ही व्यक्ती 93 नागरिकांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली होती. त्यामुळे आता प्रशासनाने त्या ग्रुपमधील इतरांचा शोध घेण्याचे कार्य हाती घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून अत्यंत बारकाईने नियोजन सुरू असल्याचे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे शहरातील काही भागात 144 कलम लावण्याचा विचार सुरू आहे. त्याचबरोबर अनावश्यक गर्दी टाळण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. पुण्यातील ओपन पार्क बंद करण्यात येणार आहेत. वसतिगृहात जे विद्यार्थी राहत आहेत. त्यांना बाहेर काढण्याच्या कुठल्याही सूचना नाहीत. परीक्षा होईपर्यंत हे विद्यार्थी वसतिगृहातच राहतील. सरकारने मॉल्स बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पण, मॉल्समधील मेडिकल, भाजीपाला आणि किराणा साहित्यांचे दुकाने सुरू राहतील. याशिवाय कुठलेही दुकान सुरू ठेवले जाणार नाही,’ असेही डॉ. म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कोरोना लक्षणे असलेल्या प्रवाशाच्या संपूर्ण माहितीसाठी ॲप तयार केले आहे. परदेशातून प्रवास करून आलेल्या व घरीच थांबण्याचा सल्ला दिलेल्या प्रवाशालाही या ॲपमध्ये वेळोवेळी आपल्या आजाराबाबतची स्थिती नोंदविता येणार आहे. तसेच घरीच असलेल्या विलगीकरण कक्षाबाबत स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व पुणे व पिंपरी चिंचवडचे मनपा आयुक्त यांना कोरोना संदर्भात ज्या ज्या उपाययोजना आवश्यक आहेत, त्या करण्यासाठी सर्व अधिकार देण्यात आल्याचे सांगतानाच कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या जिल्हयात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली असली तरी नागरिकांनी घाबरुन जाण्याचे तसेच कोणत्याही अफवेला बळी पडण्याचे कारण नाही. त्यांनी यात्रा, उत्सव, लग्न समारंभ असे गर्दीची ठिकाणे टाळावीत. जिल्हयात ज्या संस्थांना धार्मिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रमांना परवानगी दिली आहे ती रद्द करण्यात येणार असून पुढील आदेश होईपर्यंत कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे शहरातील काही हौसिंग सोसायटीत परदेशातून प्रवास करून आलेल्या व घरीच विलगीकरण केलेल्या प्रवाशाला त्रास देण्याचा प्रयत्न झाला. यापुढे कोणत्याही प्रवाशाला नकारात्मक टिपणी अथवा असा कोणत्याही प्रकारचा त्रास दिला तर त्यांच्याविरूदध तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल. घाबरू नका आणि बिनधास्तही राहू नका असा सल्ला देतानाच कोरोना आजारावर मात करण्यासाठी प्रशासन सक्षम आहे, यासाठी आपण प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.