नवनियुक्त भारतीय लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांचा विशेष सत्कार

Share this News:

20/12/2019,पुणेः ‘ज्ञान प्रबोधिनी प्रशाले’च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त रविवार दिनांक २२ डिसेंबर २०१९ रोजी, न्यू इंग्लिश स्कूल पटांगण, टिळक रोड,पुणे येथे माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला असून या महामेळाव्यात प्रशालेच्या गेल्या पन्नास वर्षांतील किमानअडीच हजार माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. यावेळी नवनियुक्त भारतीय लष्करप्रमुख लेफ्टनंटजनरल मनोज नरवणे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीष बापट आणि कार्यवाह सुभाष देशपांडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. मिलींद नाईक आणि ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या माजी विद्‌यार्थी सुकाणू समितीचे शशांक चांदोरकर, ज्येष्ठ पत्रकार आणि माजी विद्यार्थी सुकाणू समितीचे आनंद आगाशे आदी मान्यवर उपस्थित होते.

हा महामेळावा रविवार दिनांक २२ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत होणार आहे. ‘ज्ञान प्रबोधिनी’ संस्था आणि प्रशालेचे माजी विद्यार्थी यांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला असून, तो केवळ माजी विद्यार्थी आणि निमंत्रितांसाठीच आहे. प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये शासकीय सेवेबरोबरच शिक्षण, संशोधन, उद्योग, व्यापार, वैद्यकीय, क्रीडा, अभियांत्रिकी, प्रसारमाध्यमे, कला अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठी कामगिरी बजावणाऱ्या अनेक नामवंतांचा समावेश आहे.

तर यासर्वांचे प्रतिनिधी म्हणून नवनियुक्त भारतीय लष्करप्रमुख लेफ्टनंटजनरल मनोज नरवणे, तसेच ‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालया’चे संचालक आणि ‘ज्ञानप्रबोधिनी मेडिकल ट्रस्ट’चे विश्वस्त डॉ.धनंजय केळकर यांचा विशेष सत्कार ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीष बापट करण्यात येणार आहे.

या महामेळाव्यात दुपारी २.०० वाजेपासून विविध कार्यक्रम होणार आहेत. दुपारी २ ते ४ या वेळात प्रशालेच्या गेल्या पन्नास वर्षांतीलशिक्षकांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांशी त्यांचा संवादही आयोजित करण्यात आला आहे. पर्यावरण आणि शाश्वत विकास, तंत्रज्ञानाचे जीवसृष्टीवर होऊ घातलेले विविधांगीपरिणाम, रोजगारनिर्मितीची आव्हाने, आणि राष्ट्रीय एकात्मता या चार विषयांवर प्रबोधिनीच्या माजी विद्यार्थ्यांच्या विशेषगटांनी गेल्या काही काळात केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष कार्यक्रमात सादर केले जातील. तसेच या अभ्यास गटांच्या संशोधन कार्यात जोडूनघेण्यासाठी इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थिनींना आवाहन करण्यात येईल.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कंठसंगीत, वाद्यसंगीत, शास्त्रीयनृत्य आदी क्षेत्रांत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा कलाविष्कार सादर होईल.