लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योग क्षेत्रात महिलांचे योगदान २० टक्के व्हावे यासाठी प्रयत्न – सुधीर मुनगंटीवार
आज मंत्रालयात वित्तमंत्र्यांच्या हस्ते “आम्ही उद्योगिनी” मासिकाच्या जून २०१९ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संपादिका मीनल मोहाडीकर यांच्यासह आम्ही उद्योगिनीच्या राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होत्या. आम्ही उद्योगिनीचा जून २०१९ चा अंक हा वन आणि पर्यावरण संरक्षणावर आधारित आहे.
श्री. मुनगंटीवार म्हणाले, होतकरू युवक युवतींसाठी सर्वसमावेशक स्वंयरोजगाराला प्रोत्साहन देणारा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे. शासनाचा लघु आणि मध्यम उद्योग वाढीवर भर असून राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाकरिता पार्क तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये आम्ही उद्योगिनी या महिला उद्योजकांच्या संस्थेने पुढाकार घेऊन पहिल्या टप्प्यात १० हजार महिलांना प्रशिक्षण द्यावे अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.
देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करावयाची असेल तर मोठ्या उद्योगांप्रमाणे कुटीर आणि हस्तकला उद्योगांना प्राधान्य दिले पाहिजे. राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची संख्या वाढली पाहिजे. हे लक्षात घेऊनच राज्यात असे ५० पार्क पथदर्शी स्वरूपात उभारण्यात येतील. योजनेअंतर्गत विकसित केलेलया भुखंडापैकी ३० अक्के भूखंड महिला उद्योजकांकरिता राखीव ठेवण्यात येणार आहेत,योजनेसाठी ३०० कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे. आम्ही उद्योगिनी ने पुढाकार घेऊन चंद्रपूर, गडचिरोली सारख्या भागातही महिला उद्योजकांना प्रशिक्षण द्यावे, तेथे ही महिला उद्योजक विविध उद्योगांच्या माध्यमातून पुढे येतील असे पहावे असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले. एक गाव- एक क्लस्टर पद्धतीने उद्योगांचा विकास करतांना तयार वस्तूच्या विक्रीची बाजारपेठ ही शोधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
शासनाने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान ६०० वरुन १ हजार रुपये केले आहे. यात अनेक महिलांचा समावेश आहे. या महिलांना स्वंयरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्यासाठी आम्ही उद्योगिनी संस्थेने पुढाकार घ्यावा, विधवा,परित्यक्ता, घटस्फोटिता महिलांना उद्योग-व्यवसायाचे प्रशिक्षण द्यावे, हस्तकला, कुटीर उद्योगावर लक्ष केंद्रीत करावे आणि त्यांना अवलंबित्वाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यास सहकार्य करावे असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.