महाराष्ट्रातील टँकर माफियांवर नियंत्रण ठेवा सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी

Share this News:

दिल्ली, दि. २१ (प्रतिनिधी) – लोकसभेत आज शून्य प्रहरादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील दुष्काळ आणि पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. राज्यात टँकर माफियांनी धुमाकूळ घातला असून सरकारने नियंत्रण ठेवावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

विद्यमान राज्य सरकारने महाराष्ट्रात जलसंधारणासाठी ‘जलयुक्त शिवार’ सारखी योजना राबवली असली तरी राबविताना त्यात अनेक त्रुटी राहिल्या आहेत. परिणामी ही योजना अनेक ठिकाणी फोल गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे अशा योजना अंमलात आणण्यापुर्वी जलसंधारणाशी संबंधित विविध घटकांना विचारात घेतले पाहिजे, अशी भूमिका सुळे यांनी मांडली.

महाराष्ट्रातील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागात भीषण दुष्काळी परिस्थिती असून अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू आहेत. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांनी अद्याप खरिपाच्या पेरण्या केल्या नसून मशागतीची कामेही ठप्प आहेत. शेतकऱ्यांघरचे पशुधन चारा छावण्यामध्ये पाठविण्यात आले असून छावण्यानाही चारा उपलब्ध होत नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे, ही बाब सुळे यांनी केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिली.

राज्य सरकारच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे उजनी धरणातील पाणीसाठा पूर्णतः संपला असून सध्या या धरणात शून्य जलसाठा शिल्लक आहे. गावेच्या गावे आणि वाड्या वस्त्यांवर टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. त्यातही टँकरने माफियांनी धुमाकूळ घातला असून सर्वसामान्य नागरिकांची सर्रास लूट सुरु आहे. यावर माफियांवर सरकारने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.