पालघर जिल्ह्यात बालमृत्यूदरात घट – पंकजा मुंडे

Share this News:

मुंबई, दि. 27 : अब्दुल कलाम आहार योजनेअंतर्गत गर्भदा व स्तनदा मातांना उच्च प्रतीचा पोषण आहार मिळावा यासाठी बालआरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहेत. आरोग्य विभाग व महिला व बाल विकास विभागाने संयुक्त‍िकरित्या काम करून बालमृत्यूदरात घट आणली आहे. पालघर जिल्ह्यात विविध आजारांनी बालकांचे मृत्यू झाले असले तरी कुपोषणाने एकही बालकाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती महिला व बालकल्याण विकास विभाग मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली.

पालघर जिल्ह्यातील महिलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराबाबत सदस्य अबू आझमी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्रीमती मुंडे बोलत होत्या.

श्रीमती मुंडे म्हणाल्या, पोषण आहारासाठी राज्यात स्वतंत्र निधी असून, बालमृत्यूचे प्रमाण कमी असण्यामध्ये शासन पहिल्या क्रमांकावर आहे. कुपोषण पुर्णत्: संपविण्यासाठी शासन विशेष मोहीम राबविणार आहे. पालघर जिल्ह्यात मुदतपूर्व प्रसृती झाल्याने १५ बालके दगावली तर विविध आजारांमुळे बालके दगावल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र कुपोषणाने बालमृत्यू झाले नाहीत. केंद्र शासनाकडे अतिरिक्त धान्याची मागणी करण्यात आली असून, एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीसाठी आवश्यक तेवढे नियतन प्राप्त झाले असल्याची माहितीही श्रीमती मुंडे यांनी दिली.

या चर्चेत सदस्य सर्वश्री दिलीप वळसे-पाटील, अमिन पटेल, राजेंद्र पाटणी, वैभव पिचड यांनी सहभाग घेतला.