वीजग्राहकांना पर्यावरणस्नेही बनण्याची संधी
बारामती, दि. 13 जानेवारी 2020 : वीजबिल किंवा पावतीच्या कागदाचा वापर बंद करून पर्यावरणस्नेही बनण्याची संधी महावितरणने वीजग्राहकांना उपलब्ध करून दिली असून आतापर्यंत बारामती परिमंडलामधील सोलापूर, सातारा जिल्ह्यासह बारामती, इंदापूर, भोर, पुरंदर, शिरूर व दौंड (जि. पुणे) या तालुक्यांतील 7847 वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’मध्ये सहभाग नोंदविला आहे.
महावितरणने पर्यावरणपुरक योजना म्हणून छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. या योजनेमुळे वीजग्राहकांचे देखील वार्षिक 120 रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय वीजबिल दरमहा ‘ई-मेल’ तसेच ‘एसएमएस’द्वारे मिळणार असल्याने ते लगेचच ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध होत आहे. ज्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त बिल किंवा महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर असलेले वीजबिल डाऊनलोड व प्रिंट करण्याची सोय आहे. विशेष म्हणजे ही वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत व ते रंगीत स्वरुपात देखील प्रिंट केले जाऊ शकते. महावितरणच्या बारामती मंडल अंतर्गत बारामती व इंदापूर तालुक्यात 697 (बारामती विभाग), दौंड व शिरुर तालुक्यात 844 (केडगाव विभाग) आणि भोर व पुरंदर तालुक्यात 340 (सासवड विभाग) अशा एकूण 1881 वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’मधून वीजबिलासाठी छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ला पसंती दिली आहे.
तसेच मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या बारामती, इंदापूर, भोर, पुरंदर, शिरूर व दौंड तालुक्यांतील सुमारे 5 लाख 27 हजार वीजग्राहकांना ‘एसएमएस’ द्वारे बिलाची रक्कम, देय दिनांक आदींचा तपशील, दरमहा वीजबिलाचा व वीजबिल भरण्याच्या मुदतीचा तपशील, मीटर रिडींग घेण्याची तारीख व कालावधी, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व एकूण युनिटचा वापर आदींसह विविध स्वरुपाची माहिती निशुल्क दिली जात आहे. वीजबिलासाठी ग्राहकांनी छापील कागदाऐवजी ईमेलचा पर्याय निवडल्यास त्यांचा पर्यावरण रक्षणासाठी हातभार लागणार आहे व वीजबिलात दरवर्षी 120 रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय महावितरणने ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सुट दिली असून क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅश कार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’द्वारे होणारा वीजबिल भरणा निःशुल्क करण्यात आलेला आहे. त्यामुळे छापीलऐवजी वीजबिलांचे व पावत्यांचे सॉफ्टकॉपीमध्ये जतन करणे सोयीचे होणार आहे.
‘गो-ग्रीन’चा पर्याय निवडण्यासाठी वीजग्राहकांनी वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.