बोट दुर्घटना घडलेल्या ब्रम्हनाळ गावातील पूरग्रस्तांसाठी भोसरीतून दोन टेम्पोतून जीवनावश्यक साहित्य पाठविले आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

Share this News:

पिंपरी, 10 ऑगस्ट – पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाला भोसरी परिसरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मदतीचा महापूर आला आहे. सांगली जिल्ह्यातील बोट दुर्घटना घडलेल्या ब्रम्हनाळ गावातील पूरग्रस्तांसाठी भोसरीतून जीवनावश्यक साहित्याचे दोन टेम्पो आज (शनिवारी) पाठविण्यात आले आहेत. लगतच्या चार गावातील 700 ते 800 घरांना पुरेल एवढे हे साहित्य आहे.

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात महापूर आला आहे. या महापूराने कधीच न भरुन येणारी हानी झाली आहे. पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावात बोट उलटून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या महापुरामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. पशुधनाचे नुकसान झाले आहे. या भागातील नागरिकांच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक सरसावले आहेत.

सांगलीचे सुहास पाटील यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे मदत मागितली होती. आमदार लांडगे यांनी तातडीने जीवनावश्यक साहित्याचे दोन टेम्पो रवाना केले आहेत. त्यामध्ये कपडे, ब्लँकेट, चादर, मेणबत्ती, खाद्यउपयोगी साहित्य, औषधे, प्रथमोपचार पेटीचा समावेश आहे. सहा ते सात गावातील 700 ते 800 घरांना पुरेल एवढे हे साहित्य आहे.

सुहास पाटील म्हणाले, मदत मागताच आमदार महेश लांडगे यांनी दोन टेम्पो जीवनावश्यक साहित्य दिले आहे. हे साहित्य सांगली जिल्ह्यातील बोट दुर्घटना घडलेल्या ब्रम्हनाळ गावातील नागरिकांना देण्यात येणार आहे. तसेच सुकवाडी, खटाव, चोपडेवाडी या गावातील नागरिकांना हे साहित्य देण्यात येणार आहे. ही चारही गावे कृष्णा नदीच्या काठेवरती आहेत. या गावांना मदत देण्यासाठी साहित्याचे टेम्पो भोसरीतून निघाले आहेत. सुनील गायकवाड, अनिकेत जगताप आम्ही टेम्पोसोबत आहोत.

आमदार महेश लांडगे म्हणाले, अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगलीतील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना मोठी मदतीची आवश्यकता आहे. सामाजिक भावनेतून भोसरीतील नागरिक देखील मदत करत आहेत. आज जीवनावश्यक साहित्याचे दोन टेम्पो पाठविले आहेत. आणखीन एक टेम्पो भरेल. एवढे साहित्य शिल्लक आहे. कोल्हापूर, सांगली, साता-यातील कराड भागातील पूरग्रस्तांना हे साहित्य पाठविण्यात येणार आहे.

महेशदादा स्पोर्टस्‌ फाउंडेशन, अविरत श्रमदान, सांकोसा मित्र मंडळ, पश्चिम महाराष्ट्र युवा मंच आदी सामाजिक संस्था संघटना यासाठी सहकार्य करत आहेत. त्यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी साहित्य गोळा करुन पाठविले जात आहे.