गुढीपाडवा दिनी तरुणाईने दिला मतदान जागृतीचा संदेश 

Share this News:
मैत्रयुवा फाऊंडेशनतर्फे गुढीपाडव्यानिमित्त पुस्तक दिंडीचे आयोजन : विविध क्षेत्रातील दिग्गजांचा सहभाग
पुणे : गुढी चैतन्याची, गुढी मांगल्याची, गुढी संस्काराच्या, गुढी ज्ञानाची या संदेशाबरोबरच मतदान करा, लोकशाही बळकट करा, आय विल वोट अशा घोषणा देत तरुणाईने एकत्रित येत गुढीपाडव्याला मतदान जनजागृतीचा संदेश दिला. तसेच वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी पुस्तक दिडींचे आयोजन करण्यात आले. गुढीपाडव्याच्या परंपरेला वाचनसंस्कृती आणि भाषासंवर्धनाची जोड देण्याबरोबरच मतदान जागृतीचा संदेश देत मैत्रयुवा फाऊंडेशनने गुढीपाडवा अनोख्या पद्धतीने उत्साहात साजरा केला. यावेळी विविध क्षेत्रातील दिग्गज देखील दिंडीत सहभागी झाले.
मैत्रयुवा फाऊंडेशन च्यावतीने बाजीराव रस्त्यावरील आचार्य अत्रे सभागृह चौकापासून पुस्तक दिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, कारागृह प्रशासनाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव,सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) प्रभाकर ढमाले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, विशेष शाखेच्या पोलीस निरिक्षक वैशाली चांदगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक (वाहतूक) सुरज पाटील, रेल्वेच्या ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर सुप्रिया देशमुख, प्रा.डॉ.सचिन वानखेडे, ढोलताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, बालसदन संस्थेच्या अश्विनी नायर, अध्यापिका विदयालयाच्या अश्विनी पानवलकर, दिलासा कार्यशाळेच्या मेघना जोशी, मैत्रयुवाचे अध्यक्ष संकेत देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या पुस्तक दिंडीत पारंपरिक वेशातील तरुणाई सहभागी झाली होती. त्याचबरोबर शिववर्धन, मृत्युंजय, वज्र या ढोलताशा पथकांच्या वादनात मिरवणुक काढण्यात आली.
डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, ही गुढी ज्ञानाची विवेकाची, बंधुत्वाची आहे हे या तरुणाईने एकत्रित येत साध्य केले आहे. सध्या सामाजिक उपक्रमाची जाणीव घेऊन तरुणाई एकत्र येताना दिसत आहे. मैत्रयुवामधील तरुणाई देखील आपण समाजाचे देणे लागतो, या जाणीवेतून वाटचाल करताना दिसत आहे. पुस्तक दिंडीसारख्या उपक्रमांमधून साहित्याचा, शद्बांचा, विचारांचा वृक्ष सर्वांच्या आयुष्यात बहरावा, असे ही त्यांनी सांगितले.