महालक्ष्मी मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त पाणी बचतीचा संदेश

Share this News:
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागेच्यावतीने गुढीपूजनाचे आयोजन

पुणे : गुढीपाडव्यानिमित्त श्री महालक्ष्मी मंदिरात गुढी पूजन करण्यात आले. गुढीपाडव्याच्या या सणाला सामाजिकतेची जोड देत यावेळी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. मराठी नववर्षाचा पहिलाच दिवस असल्याने भाविकांनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी मंदिराला आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली.

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागेच्यावतीने चैत्र शुध्द प्रतिपदा, गुढीपाडव्याला गुढीपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल व विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी उपस्थित होते. मंदिराचे मुख्य पुजारी श्रवण शर्मा यांच्या हस्ते गुढीची विधीवत पुजा करून गुढी उभारण्यात आली.

अ‍ॅड. प्रताप परदेशी म्हणाले, श्री महालक्ष्मी मंदिरात गुढी पूजनाबरोबरच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीचा संदेशही देण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यंदाही चैत्र नवरात्रनिमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, १२ एप्रिल रोजी मंदिरामध्ये महिलांकरीता हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक १३ एप्रिल रोजी रामजन्म सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी सकाळी ११ वाजता भजनसंगीताचा कार्यक्रम होणार आहे. तसेच मुलांमध्ये अध्यात्माची आवड निर्माण व्हावी म्हणून रविवार, दिनांक १४ एप्रिल ते गुरूवार, दिनांक २ एप्रिल पर्यंत संस्कार वर्ग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात श्रीसुक्त, अथर्वशीर्ष, मंत्र पठण होणार आहे. तसेच प्रज्ञासंर्वधन, बौद्धिक खेळ व स्पर्धा होणार आहेत.