कसबा पेठ मतदार संघात बूथ अॅपद्वारे मतदानाची सुविधा

Share this News:

पुणे, दि. १९: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने २१५-कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची दुसऱ्या पायलट प्रोजेक्ट(2nd Pilot Project) मध्ये निवड केली आहे.

२१५-कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात बूथ अॅप (Booth App) द्वारे ‘दुसरा पायलट प्रोजेक्ट’ या सुविधा अॅप्लिकेशन नुसार बारकोडच्या प्रक्रियेद्वारे मतदारांना मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पारदर्शक व सुलभ मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी हा उपक्रम पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात येणार आहे. या बूथ अॅपचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

• याबूथ अॅप चा उद्देश – क्युआर कोडद्वारे मतदारांची ओळख पटविण्यासाठी कमी कालावधी लागतो. त्याचप्रमाणे मतदारांना रांगेत प्रतीक्षा करत उभे न राहता मतदानाची प्रक्रिया ही सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडली जाते.
• या प्रकियेमुळे मतदान प्रक्रिया जलद गतीने पार पाडली जाऊन मानवी हस्तक्षेपाशिवाय मतदानाची त्रुटी मुक्त टक्केवारी (Poll Turnout) प्राप्त होण्यास मदत होते.
• या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मतदानाची टक्केवारी स्वयंचलित पद्धतीने मोजण्यात येते आणि दुबार नोंदणीस प्रतिबंध घातला जातो.
• या बूथ अॅप मुळे मतदान प्रक्रियेस कमी कालावधी लागत असल्याने अधिकाधिक नागरिक मतदान करण्यास उत्सुक राहतील.

हे सर्व फायदे लक्षात घेता २१५-कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी मनामध्ये कोणतीही साशंकता न बाळगता मतदान प्रक्रियेमधे सामील होवून मतदानाचा हक्क बजावावा. तसेच लोकशाहीच्या उत्सवामध्ये बहुमूल्य सहभाग नोंदवावा, असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी मतदारांना केले आहे.