भोसरी भयमुक्त करण्यासाठी आम्ही पोलिस आयुक्तालय केलं : महेश लांडगे

Share this News:

पिंपरी (दि. 19 ऑक्टोबर 2019) : भोसरी भयमुक्त करण्याची भाषा करणारे स्वत: काठ्या घेऊन बाहेर पडणार होते की काय? असा सवाल करत आमच्याच सरकारने पोलिस आयुक्तालय केले हे लक्षात घ्या असा टोला भोसरीचे आमदार व महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी येथे जाहिर सभेत हाणला.

 

 

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी भोसरी गावजत्रा मैदान येथे आयोजित सभेत लांडगे बोलत होते. यावेळी भाजपचे खासदार गिरीष बापट, अमर साबळे, शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महापौर राहुल जाधव, महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे सभापती विलास मडेगिरी, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा शैला मोळक, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवी लांडगे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख इरफान सय्यद, जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, महाराष्ट्र मजूर पक्षाचे भाऊसाहेब अडागळे आदी उपस्थित होते.

 

 

यावेळी आमदार लांडग यांनी राष्ट्रवादीकडून होत असलेल्या टिकेला जोरदार उत्तर दिले. ते म्हणाले की, दिवा विझताना मोठा होतो त्यांनी माझ्याविषयी मुळा, गाजर, हत्ती असे शब्द वापरले. कारण मी त्यांच्या स्वप्नात येतो मात्र त्यांना सभेला भाड्याने माणसे आणावी लागतात हे दुदैव आहे. शीतलबाग पुलाच्या वाढलेल्या खर्चाबद्दल आपल्यावर टिका केली जाते. मात्र, त्यावेळी तुमच्या घरातलाच महापौर होता. विरोध का केला नाही? असा सवाल त्यांनी केला. मी मोठा होत होतो तेव्हा त्यांच्या डोळ्यात सलत होतो. आता मी मोठा झालो तर ते माझे पाय ओढत आहेत, अशी टिका त्यांनी विलास लांडे यांचे नाव न घेता केली.

 

 

भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व मी रोज पदांची आश्वासने देतो. सोसायटी टॅंकर लॉबी, भयमुक्त असे शब्दही ते भाषणात वापरतात. मात्र, 2014च्या आधी त्यांना हे कळाले असते तर मी आज आमदार नसतो. रेडझोनच्या प्रश्नाचे त्यांनी काय केले हे सांगावे, हा प्रश्न कितीतरी वर्ष लोंबकळत पडला आहे. शास्तीकर रद्द करा असे ते आज म्हणतात. पण विधी मंडळ सभागृहात हा विषय पारित झाला तेव्हा त्यांनी विरोध का केला नाही? असा सवाल आमदार लांडगे यांनी केला. आम्ही शास्तीकर एक हजार स्क्वेअर फुटापर्यंत माफ करण्याची मानसिकता दाखवली, तुम्ही तेही केले नाही, बफर झोन, साडेबारा टक्के जमिन परताव्याचा प्रश्न आम्ही सोडवला. हे लक्षात घ्या, असे आमदार लांडगे म्हणाले. शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन भामा आसखेड योजना आम्ही आणली. मोशी कचरा डेपो येथे कच-याचे डोंगर झाले होते. कचरा टेंडरमध्ये घोटाळा होत होता. म्हणून आम्ही वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आणला तर यांना तिथेही भ्रष्टाचार दिसू लागला, अशी टिका त्यांनी केली.