गुंतवणूक केलेला पैसा खातेदारांना मिळणे अत्यावश्यक घोटाळेबाज कंपन्यांवर अंकुश ठेवण्याची सुप्रिया सुळेंची मागणी
दिल्ली, दि. २५ (प्रतिनिधी) – गुंतवणूक क्षेत्रात फसवणूक करणाऱ्या कंपन्या आणि संबंधीत संचालकांवर कारवाई होणे गरजेचे आहेच. त्याचबरोबर त्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे पैसे परत मिळणेही तितकेच महत्वाचे आहे. याबद्दल सरकारने आवशयक ती पावले उचलावीत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.
अनियंत्रित जमा विधेयकावर सभागृहात चर्चा सुरू होती. त्यावेळी बोलताना सुळे यांनी महाराष्ट्रातील ‘समृद्ध जीवन’ आणि ‘पॅनकार्ड क्लब’ यांसारख्या घोटाळेबाज कंपन्यांचा उल्लेख केला. शेकडो नागरिकांची आयुष्यभराची कमाई या कंपन्यांत अडकली आहे, असे त्या म्हणाल्या. अशा प्रकरणांमध्ये केवळ संबंधित व्यक्तीला शिक्षा करणे हाच केवळ मुख्य उद्देश असू नये, तर खातेदारांना त्यांची रक्कम परत मिळायला हवी याकडेही लक्ष असावे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या कंपन्यांत गुंतविलेले गुंतवणूकदारांचे पैसे त्यांना परत कधी मिळणार हा प्रश्न असून याबद्दल केंद्र सरकार आणि सेबी काय करीत आहेत, अशी विचारणाही सुप्रिया सुळे यांनी केली. ‘समृद्ध जीवन’चा सुत्रधार महेश मोतेवार हा सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून सुटू शकतो ही बाब चिंताजनक आहे. अशा गुन्हेगारांच्या परदेशातील बेनामी संपत्तींची माहिती घेण्याचे मार्ग सरकारने शोधावेत, असेही त्या म्हणाल्या.
चौकट
आर्थिक साक्षरता विधेयक आणावे
खातेदार व गुंतवणूकदारांची फसवणूक टाळण्यासाठी त्यांच्यात आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूकीबाबत जागरुकता करण्यात यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली. त्यासाठी केंद्र सरकारने विधेयक किंवा वटहुकूम आणावा, असेही त्या म्हणाल्या.
