महावितरण ग्राहक संपर्क अभियानात एकाच दिवशी 530 तक्रारी निकाली
पुणे, दि. 11 : महावितरण ग्राहक संपर्क अभियानात मंगळवारी (दि. 11) पुणे शहरासह मंचर व पेठ या ग्रामीण भागातील वीजग्राहकांच्या एकूण 696 पैकी 530 तक्रारी जागेवरच सोडविण्यात आल्या. तर प्रलंबित 166 तक्रारी ठराविक वेळेत सोडविण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.
वीजग्राहकांचे विविध प्रश्न, तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी महावितरणच्या वतीने पुणे परिमंडलात महावितरण ग्राहक संपर्क अभियान सुरु करण्यात आले. पुणे शहरातील पद्मावती विभाग तर हडपसर उपविभाग-2, वडगाव शेरी उपविभाग, सेंटमेरी उपविभाग व वारजे उपविभाग कार्यालय, नांदेड गाव तसेच मंचर विभागातील मंचर व पेठ शाखा कार्यालयात या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वीजबिल व वीजसेवेविषयक विविध प्रकारच्या तक्रारी, निवेदन व अर्ज स्वीकारण्यात आले आणि त्याचा निपटारा करण्यासाठी जागेवरच कार्यवाही सुरु करण्यात आली. तसेच आलेल्या वीजग्राहकांना वीजसुरक्षा, महावितरणची विविध ग्राहकसेवा, मोबाईल अॅप व मोबाईल क्रमांकाची नोंदणी आदींबाबत माहिती देण्यात आली. वीजग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत स्वतःचा मोबाईल क्रमांक नोंदणी करण्यासाठीही चांगला प्रतिसाद दिला.
पुणे शहरात सहा ठिकाणी झालेल्या या अभियानात 461 पैकी 424 तक्रारी तर मंचर विभागातील मंचर व पेठ येथील 235 पैकी 106 तक्रारी जागेवरच निकाली काढण्यात आल्या. यातील प्रलंबित एकूण 166 तक्रारी व अर्जांवर तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही आवश्यक असल्याने त्या ठराविक वेळेत सोडविण्यात येणार आहे व संबंधित ग्राहकांना त्याबाबत कळविण्यात येणार आहे. ग्राहक संपर्क अभियानाला मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे, अधीक्षक अभियंता सर्वश्री सुंदर लटपटे, महेंद्ग दिवाकर, श्री. राजेंद्ग पवार यांनी भेटी देऊन ग्राहकांशी संवाद साधला व अपेक्षाही जाणून घेतल्या. या अभियानात संबंधित विभागांचे अभियंते, लेखा अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
हडपसर, भोसरी, प्राधिकरण, आकुर्डी, नगररोड उपविभागात अभियान – बंडगार्डन विभागातील हडपसर-1 उपविभागात बुधवारी (दि. 12) तर भोसरी विभागातील आकुर्डी उपविभागात गुरुवारी (दि. 13) तर प्राधिकरण व भोसरी उपविभागात शनिवारी (दि. 15) तसेच नगररोड उपविभागात शुक्रवारी (दि. 14) या अभियानाचे त्याच उपविभाग कार्यालयांत सकाळी 11 वाजता ग्राहक संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वीजबिल दुरुस्ती, नवीन वीजजोडणी, वीजबिलाच्या नावात बदल, सदोष वीजमीटर किंवा रोहित्र बदलणे आदींबाबत अर्ज, तक्रारी, निवेदने स्वीकारण्यात येणार आहेत.
