‘रंग पांडुरंग‘ अभंग, भक्तीगीतांचा कार्यक्रम बुधवारी रंगणार
पुणे, दि. १३ – आषाढी एकादशीच्या चंद्रभागेच्या तीरावर वैष्णवांचा मेळा पांडुरंगा चरणी लीन होतो. आषाढी वारीच्या निमित्ताने पांडूरंगाच्या भक्तीरसात पुणेकर न्हावून निघणार आहेत, निमित्त आहे बुधवार (दि. १८ जुलै) रोजी संगीतकार प्रसाद जोशी यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘रंग पांडूरंग’ या अभंग, भक्तीगीतांच्या विशेष कार्यक्रमाचे.
एम. ई. एस. सभागृह बालशिक्षण मंदिर, मयूर कॉलनी, कोथरूड येथे १८ जुलै रोजी सायंकाळी ५ वा. आयोजीत ‘रंग पांडूरंग’ या विशेष कार्यक्रमात प्रसाद जोशी यांनी स्वरबद्ध केलेल्या मकरंद वळे यांच्या रचनांचे सादरीकरण होणार आहे, यामध्ये ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. रघुनंदन पणशीकर, आनंद भाटे, राहुल देशपांडे, चारुदत्त आफळे, मंजुषा पाटील, किशोर कौशल आणि ज्ञानेश्वर मेश्राम आपल्या सुमधुर गायनाने रसिकांना भक्तीरसात मंत्रमुग्ध करणार आहेत, तसेच या प्रसंगी ‘रंग पांडुरंग’ या सीडीचे प्रकाशन करण्यात येईल अशी माहिती प्रसाद जोशी यांनी दिली.
कार्यक्रमाची संकल्पना सांगतान जोशी म्हणाले, मी अनेक सांगीतिक कार्यक्रमात तबला वादन केले आहे, पांडूरंगाच्या वारीला जाणारे वारकरी बघितले की त्यांच्यातील उर्जेचे मला आकर्षण वाटायचे, त्यामुळे मी वारीला जायला लागलो, सलग पाच वर्षे वारी केली, एका कार्यक्रमात मकरंद वळे यांचे अभंग वृत्तातील काव्य ऐकले आणि त्यातून हा कार्यक्रम व सीडीची निर्मिती झाली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी करणार असून हा कार्यक्रम निमंत्रित पुणेकरांसाठी विनामुल्य असणार आहे.
