विविधतेतील एकतेची ओळख करून देणारा ‘के टू के कार्निवल’
पुणे २९ मार्च २०१९ :भारत हा वैविध्यपूर्ण संस्कृतीने नटलेला देश आहे. या वैविध्यातच आपली एकता आहे असे आपण म्हणतो. तेच पुणेकरांसाठी प्रत्यक्षात आपल्या घर जवळ अनुभवता यावे म्हणून अगदी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतची खाद्य संस्कुती आणि त्याबरोबरच कला, संगीत, नृत्य, परंपरा यांचाही अगदी जवळून अनुभव घेता येईल असा ‘के टू के कार्निवल’ आयोजित करण्यात आला आहे. ‘स्वामी समर्थ ग्रुप’च्या ‘समर्थाज इव्हेंट्स’द्वारा आयोजित हा महोत्सव ३० व ३१ मार्च रोजी औंध-बाणेर लिंक रस्त्यावरील धनकुडे लॉन्स येथे होणार आहे.
पुणे हे आयटी हब, शिक्षणाचे माहेरघर असल्याने देशभरातून लोक येथे नोकरी शिक्षणाच्या निमित्ताने येतात. त्यांना त्याच्या प्रांताची चव येथेही चाखता यावी, आपल्या मातीची अनुभूती पुण्यात राहूनही घेता यावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन शनिवार, दि. ३० रोजी सकाळी ११ वाजता सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात खाद्य पदार्थांबरोबरच त्या त्या भागातील संस्कृती, कला, फॅशन, परंपरा, हस्तकला वस्तू, घरगुती पदार्थ, संगीत, लोकनृत्य अशा सर्वांगाने त्या प्रदेशाची ओळख करून घेता येणार आहे. यात खाद्य विभागात प्रांतांनुसार पंजाब-हरियाणा-काश्मीर, गुजराथ-राजस्थान, बंगाल-आसाम-ईशान्य भारत प्रदेश, हैद्राबाद-केरळ-दक्षिण भरत, महारष्ट्र असे विभाग करण्यात आले आहेत. याशिवाय खरेदी विभाग, रीफ्रेश्मेंट, लहान मुलांसाठी खेळण्याचा भाग आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संचालक नरेंद्र पवार यांनी दिली.
पवार म्हणाले, “सगळ्यांनाच संपूर्ण भरत फिरून तिथली संस्कृती अनुभवणे, पदार्थ चाखणे शक्य होतेच असे नाही. तसेच बरेच परप्रांतीय लोक पुण्यात येऊन स्थिरावले आहेत. परंतु त्यांना त्यांच्या प्रदेशाची आठवण येतेच. अशा सगळ्यांसाठी हा महोत्सव आहे. आपल्याला एखाद्या पदार्थाचे नाव माहित असते मात्र त्या मागचा इतिहास, त्याची चव आणि पाककृती असे सगळेच येथे जाणून घेता येणार आहे. हा आमचा पहिला महोत्सव आहे. असे आम्ही पुण्यातील विविध ठिकाणी आठ कार्निवल दर महिन्याला भरविणार आहोत.”
