बारामती मंडलामधील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम

Share this News:

बारामती, दि. 24 आॅगस्ट 2019 : बारामती मंडल अंतर्गत तीन विभागांत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 1 लाख 71 हजार 560 वीजग्राहकांकडे 31 कोटी रुपयांची थकबाकी असल्यामुळे महावितरणकडून या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे.

 

बारामती विभाग अंतर्गत भोर, पुरंदर तालुक्यात 51 हजार 840 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे वीजबिलांपोटी 7 कोटी 85 लाख, सासवड विभागातील भोर व पुरंदर तालुक्यात 46 हजार 940 ग्राहकांकडे 7 कोटी 5 लाख व केडगाव विभागातील दौंड व शिरुर तालुक्यात 72 हजार 770 ग्राहकांकडे 16 कोटी 10 लाख रुपयांची थकबाकी आहे. वांरवार आवाहन करून तसेच नोटीस पाठवून देखील वीजबिलांची थकबाकी भरली जात नसल्याने नियमाप्रमाणे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

 

महावितरणकडून सेंट्रलाईज बिलिंग सिस्टीमची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर मीटर रिडींगचे वाचन दरमहा ठराविक दिवशी व वीजग्राहकांना एसएमएसद्वारे पूर्वमाहिती देऊन केले जात आहे. तसेच वीजबिलांची रक्कम, वापरलेले युनिट, वीजबिल भरण्याची मुदत आदींची माहिती ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठविली जात आहे. सोबतच छापील वीजबिल सुद्धा योग्य वेळेत पाठविण्यात येत आहेत. याशिवाय एसएमएसद्वारे वीजबिलांच्या भरणा करण्यासाठी स्मरण देणारा संदेश पाठविला जात आहे. त्यामुळे बिलींगमधील तक्रारींचे प्रमाण पुर्वीच्या तुलनेत अतिशय कमी झाले आहे. वीजबिल भरण्याची मुदत उलटून गेल्यानंतर नियमाप्रमाणे नोटीस देखील एसएमएसद्वारे दिली जात आहे. वीजबिल भरण्यासाठी महावितरणचे संकेतस्थळ, मोबाईल ॲपद्वारे घरबसल्या सोय आहे. सद्यस्थितीत बारामती मंडल अंतर्गत सहा तालुक्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 1 लाख 71 हजार 560 वीजग्राहकांकडे 31 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणकडून आता नियमाप्रमाणे कारवाई सुरु करण्यात आली आहे.

 

चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्र, ई-वाॅलेटची सोय उपलब्ध आहे. तसेच चालू व थकीत वीजबिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल ऍ़पद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी संपूर्ण थकीत रकमेचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.