…अखेर मोशीतील दशक्रिया विधी घाटाच्या कामाला सुरुवात

Share this News:


पिंपरी, 27 डिसेंबर – गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मोशीतील दशक्रिया विधी घाटाच्या कामाला अखेर सुरुवात झाली. त्यासाठी स्थायी समितीने 4 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दशक्रिया विधी घाटाचे काम सुरु झाल्यामुळे मोशीकरांनी समाधान व्यक्त केले. 

मोशीत दशक्रिया घाट आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार दशक्रिया घाटाची जागा कमी पडत होती. त्यामुळे या ठिकाणी आणखी एक नवीन दशक्रिया घाट तयार करण्याची मागणी केली जात होती. 2008 मध्ये विकास आराखडा तयार करताना या ठिकाणी दशक्रिया विधी घाटासाठी आरक्षण टाकले होते. आरक्षण विकसित करण्यासाठी स्थायी समितीचे सभापती असताना आमदार महेश लांडगे यांनी प्रयत्न केले. त्यासाठी अर्थसंकल्पात आठ कोटी रुपयांची तरतूद केली होती. आता दशक्रिया विधी घाटाच्या कामाला सुरुवात झाली आहे. 

आमदार महेश लांडगे म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांवर आजवर मोठा अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी मी पहिल्यापासून प्रयत्न करत होतो. मोशीतील दशक्रिया घाटावर जागा कमी पडत होती. त्यासाठी या ठिकाणी नवीन घाट बांधण्यासाठी आरक्षण टाकले होते. परंतु, त्यासाठी निधीची तरतूद केली नव्हती. स्थायी समिती सभापती असताना त्यासाठी निधीची तरतूद केली. मोशीत पहिला मोठा दशक्रिया घाट बांधण्यात येणार आहे. त्याचे काम लवकरात-लवकर पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे”. 

स्थानिक नगरसेवक राहुल जाधव म्हणाले, ”याठिकाणी छटपूजेचे आणि इंद्रायणी मातेच्या भव्य आरतीचे आयोजन केले जाते. नागरिकांना दशक्रिया घाटावर जागा कमी पडत होती. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता नवीन दशक्रिया घाटाची गरज होती. आमदार महेश लांडगे यांच्याकडे मी त्यासाठी पाठपुरावा केला. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन दशक्रिया घाट बांधण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे दशक्रिया घाटाचे काम सुरू झाले आहे. याचे सर्व श्रेय आमदार महेश लांडगे यांना जाते. प्रभाग क्रमांक दोनमधील ग्रामस्थांच्या वतीने मी आमदार महेशदादांचे मनापासून आभार मानतो”.