लोकशाहीत अल्पसंख्यांक दहशतीखाली का? – आंतरराष्ट्रीय किर्तीच्या इंग्रजी लेखीका नयनतारा सहगल

Share this News:
पुणेः- भारतात सर्वकाही आलबेल आहे असे म्हटले जाते, पंरतू हे साफ चुकीचे असून लोकशाही पद्धतीमध्ये भारतातील अल्पसंख्यांक दहशतीखाली का असा परखड सवाल आंतरराष्ट्रीय किर्तीच्या इंग्रजी लेखीका नयनतारा सहगल यांनी उपस्थित केला.
आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाऊंडेशन यांच्यातर्फे दिवगंत भाई वैद्य यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त लोकनेते भाई वैद्य स्मृती गाैरव पुरस्कार आज लेखिका नयनतारा सहगल यांना प्रदान करण्यात आला. प्रकृती अस्वस्थ्यामुळे नयनतारा सहगल प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्यामुळे त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थितांशी संवाद साधला. लेखिका नयनतारा सहगल यांच्या अनुपस्थितीत सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक किरण नगरकर यांनी लेखिका नयनतारा सहगल यांच्यावतीने पुरस्कार स्विकारला. कष्टक-यांचे नेते बाबा आढाव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाउंडेशनचे अध्यक्ष डाॅ. अभिजीत वैद्य होते. यावेळी व्यासपीठावर पन्नालाल सुराणा, डाॅ. प्राची रावळ, लक्ष्मीकांत देशमुख, जयंत मटकर, प्रा. विलास वाघ, डाॅ. नितीन केतकर, प्रा. गीतांजली वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी व्हिडोओद्वारे संवाद साधताना नयनतारा सहगल म्हणाल्या की, अल्पसंख्यांक दहशतीखाली आहेत हे कशाचे लक्षण आहे? खोट्या आरोपांखाली त्यांना जेलमध्ये डांबले जात आहे आणि गुंड मोकाट वावरत आहेत. तुमच्या श्रद्धांबाबत कोणी प्रश्न उपस्थित केला की, लगेच आपल्या विरोधातला आहे असे समजून एकतर त्याला एेनकेन प्रकारे तुमच्या विचारधारेशी जुळवुन घेण्यास भाग पाडले जाते. अन्यथा त्यांचा दाभोळकर, कुलबुर्गी, गौरी लंकेश केला जातो. आमच्या सोबत या, अन्यथा परिणामांना सामोरे जा असे वातावरण अनुभवायास मिळत आहे. अशाने घटनेची पायमल्ली होत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तर पदोपदी पायमल्ली होत आहे. शाळा, महाविद्यालय स्तरांपासून बुद्धीभ्रम करण्याचे षडयंत्र सुरु आहे. कला-साहित्य-संगीत सर्वच कला सरकारच्या रडारवर आल्या असून तेथे कोणी सरकार विरोधात काही करत तर नाही ना, यावर लक्ष दिले जात आहे.
लेखीका नयनतारा सहगल यांच्या वतीने पुरस्कार स्विकारल्यानंतर सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक किरण नगरकर म्हणाले की, इतिहासातील त्यांना जी हवी आणि जशी हवी तीच व्यक्तिमत्त्वे पुढे येत आहेत तर बाकी इतिहास खोडून टाकण्याचे काम होत आहे. मोठमोठे पुतळे उभारून भारत घडणार नाही, तर प्रत्यक्ष काम करण्याची गरज आहे आणि ज्यांचे पुतळे उभे केले जात आहेत त्यांच्या विचारांवर चालण्याची गरज आहे. केवळ त्या महान नेत्यांची नावे घ्यायची, त्यांचे पुतळे उभे करायचे आणि त्यांच्या विचारांविरोधात कृती ठेवायची हे योग्य नाही.
यावेळी कष्टक-यांचे नेते बाबा आढाव म्हणाले की, भाई केवळ बोलत नाही बसले तर त्यांनी प्रत्यक्ष काम केले. महापाैर असताना देखील ते जेलमध्ये गेले होते. अन्यायाबद्दल भाईंना प्रचंड चीड होती, त्यामुळे त्या अन्यायग्रस्ताला जोवर न्याय मिळत नाही तोवर ते बैचेन असायचे. सध्याच्या सरकारने देशद्रोहाची व्याख्याच बदलली असून त्यांच्या विरोधात जो बोलेल तो देशद्रोही ठरवला जात आहे. अधिकारांचा संकोच होत चालला असल्याचा प्रत्यक्ष काम करतांना अनुभव येतो.
भाई वैद्य फाउंडेशनचे अध्यक्ष डाॅ. अभिजीत वैद्य अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, नयनतारा सहगल यांनी पुरुषप्रधान संस्कृतीकडून हक्क खेचून घेत स्त्रीयांना देखील काही सांगायचे आहे हे ध्यानात घेऊन त्या लिहित राहिल्या. कोणाच्याही दहशतीला बळी न पडता त्या सातत्याने लिहीत राहिल्या. रक्षकच संस्कृतीचे भक्षक होत आहे. भाई द्रष्टे नेते होते. समाजवादी देखील त्यांची दूरदृष्टी ओळखू शकले नाही. येणा-या संकंटांची चाहूल भाईंना बरोबर लागायची.
डाॅ. नीलिमा वैद्य यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. डाॅ. नितीन केतकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर वर्षा गुप्ते यांनी आभार मानले.