पुणेकरांनी पूरग्रस्तांच्या आरोग्याची काळजी घेत दिल्या १ हजार प्रथमोपचार पेटया

Share this News:
पुणे 25/8/2019:  कोल्हापूर, सांगली भागात उद्भभवलली पूरस्थिती ओसल्यानंतर गरज होती, ती तेथील कुटुंबांच्या आरोग्याची काळजी घेण्याची. स्थानिकांचे उध्वस्त झालेले संसार उभे करण्याकरीता शासनासह संपूर्ण महाराष्ट्रातून मोठया प्रमाणात मदतीचा ओघ आला. जीवनावश्यक वस्तूंसह अनेक गोष्टी कुटुंबाना देण्यात आल्या. मात्र, तेथील स्थानिकांच्या कुटुंबांची काळजी घेण्याकरीता पुणेकरांतर्फे १९ औषधांनी पूरिपूर्ण असलेल्या तब्बल १ हजार प्रथमोपचार पेटया पूरग्रस्तांना त्या गावांमध्ये नेऊन देण्यात आल्या.
पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्था आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटन तर्फे इचलकरंजी परिसर, चंदुर, औरवाड, शिरदवाड आदी भागात १ हजार कुटुंबांना प्रथमोपचार पेटया संस्थेच्या कार्यकर्त्यांना त्या त्या गावांमध्ये जाऊन दिल्या. यावेळी तहसीलदार सुधाकर भोसले, जिल्हाधिकारी दौलत देसाई, अतिरिक्त जिल्हा अधिकारी नंदकुमार काटकर, समीर शिंगटे, पुष्कराज जगताप, वैभव जाधव, निरंजन सेवाभावी संस्थेचे विनोद राठी यांसह संस्थांच्या पदाधिका-यांनी मोठया संख्येने पुढाकार घेतला.

सुधाकर भोसले म्हणाले, जीवनावश्यक वस्तूंमुळे पूरग्रस्तांना आधार मिळाला असला, तरी देखील दिर्घकाळ त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन पुढील काळात मदत करणे महत्त्वाचे आहे. पुणे व कोल्हापूरसह महाराष्ट्रातून आलेल्या संस्थांनी वेगवेगळ्या प्रकारे मदत दिली असली, तरी देखील प्रथमोपचार पेटयांच्या माध्यमातून आरोग्याच्या दृष्टीने चांगले मदत झाली आहे. यामुळे त्या कुटुंबांना प्राथमिक स्तरावर स्वत:ला लागेल तो औषधोपचार करता येणार आहे.

पुष्कराज जगताप म्हणाले, प्रथमोपचार पेटयांमध्ये डेटॉलसह निलगिरी तेल, पाणी स्वच्छ करण्यासाठी मेडिक्लोर, कापूस, ओडोमॉस यांसह १९ प्रकारची औषधे आहेत. या कार्यात सहभागी होऊन पूरग्रस्त कुटुंबांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता सामान्यांनी देखील पुढे यावे, असे आवाहन आम्ही करीत आहोत.

विनोद राठी म्हणाले, पूरग्रस्त कुटुंबांना प्रथमोपचार पेटी, वस्तुरुपी मदतीसह आर्थिक सहाय्य देखील देणार आहे. त्याकरीता नारायण पेठेतील निरंजन मेडिको येथे मदत स्विकारणे सुरु आहे. निरंजन संस्था स्वत: या कार्यात सक्रिय सहभाग घेत असून संस्थेचे सर्व सभासद यामध्ये आर्थिक मदत करीत आहेत. याकामी आर्थिक मदत देण्याकरीता नारायण पेठेतील नारायण पेठ पोलीस चौकीजवळ असलेल्या निरंजन मेडिको येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.