२२ परदेशी विद्यार्थी पुण्याच्या भेटीला

Share this News:

–    भारतीय सांस्कृती, सामंजस्याच्या प्रचारासाठी रोटरीचा पुढाकार

–    रोटरीचा युथ एक्सचेंज कार्यक्रम

–    महापौरांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

पुणे. ‘तरूण हा जगातला महत्वाचा भाग असून, भारतात ५७ टक्के युवक आहेत. मी देखील तरूण या नात्याने शहराचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती शिकण्यासाठी आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांचे मी शहराच्या वतीने स्वागत करतो’, असे प्रतिपादन महापौर प्रशांत जगताप यांनी शनिवारी केले.

रोटरीच्या युथ एक्सचेंज कार्यक्रमामध्ये विविध देशांमधील २२ जण पुण्यामध्ये शिक्षण आणि सांस्कृतिक देवाण घेवाणीसाठी आले आहेत. त्यांचे स्वागत पुण्याचे महापौर प्रशांत जगताप आणि रोटरीचे प्रांतपाल प्रशांत देशमुख यांच्या उपस्थित करण्यात आले. शनिवारी दुपारी महापौरांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.

महापौर जगताप म्हणाले की, पुण्याला एैतिहासीक वारसा असून, विविध ठिकाणाहून पुण्यामध्ये युवक शिक्षणासाठी येत असतात. येथे अनेक शिक्षण संस्था, कंपन्या येथे आहेत. विकासामध्ये देशात पुण्याचा दूसरा नंबर क्रमांक लागतो. त्यामुळे आपल्याला सर्वांनाच पुण्याचे चांगले कल्चर शिकायला मिळेल आणि हा तुमच्यासाठी अविस्मरणीय अनुभव असेल.

रोटरीचे प्रांतपाल प्रशांत देशमुख म्हणाले की, पुणे हे स्मार्ट शहर असून, शहराच्या संस्कृति आणि परंपरांमधून सर्वच विद्यार्थ्यांना चांगले काही तरी शिकायला मिळणार आहे.

जागतिक शांतता आणि सामंजस्य या रोटरीच्या कार्यक्रमांद्वारे अनेक देशांमधून मुल आणि मुली भारतीय संस्कृति, इतिहास व जीवन पद्धती, तसेच झपाट्याने होणारी सुधारणा यांचा अभ्यास करण्यासाठी येतात. यांची जवाबदारी विविध रोटरीयन्स एक वर्षासाठी घेतात. हे विद्यार्थी आपापल्या देशामध्ये जाउन याचा प्रचार व प्रसार करतात.