पुणे विद्यापीठातील पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के जागा राखीव – रवींद्र वायकर
Share this News:
मुंबई, दि. १ : पुणे विद्यापीठातील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के व इतर विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. ह्या राखीव जागा यापुढे कायम राहणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषद सदस्य आर्कि. अनंत गाडगीळ यांनी पुणे विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के राखीव जागा (कोटा) संदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना श्री. वायकर बोलत होते. विद्यार्थी व जनभावना विचारात घेऊन पुणे विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पूर्वीप्रमाणे ७० टक्के कोटा कायम ठेवण्यात आलेला असल्याचे श्री. वायकर यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात. सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शासनाने विहित केलेले नियम, मागासवर्गीय प्रवर्गासाठी वेळोवेळी विहित केलेले आरक्षण या बाबी विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष २००२-०३ पासून विद्यापीठ अध्यादेश लागू केला होता. त्यामधील काही तरतुदींमध्ये सुधारणा करून शैक्षणिक वर्ष २०१३-१४पासून सुधारीत अध्यादेश लागू करण्यात आला. त्यानुसार पुणे विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के व इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के कोटा विहित करण्यात आलेला होता. हा अध्यादेश कायम ठेवण्यात आला आहे.