शुध्दीकरणाव्दारे राज्याला पुन्हा एकदा विषमतेकडे घेवून जाण्याचा सरकारचा प्रयत्न.- नवाब मलिक

Share this News:

मुंबई – दि.28 : महाड येथील चवदार तळ्यातील पाण्याचे मंत्रोपच्चाराने शुध्दीकरणाचा प्रकार समोर आला असून हा शुध्दीकरणाचा प्रयत्न म्हणजे राज्याला पुन्हा एकदा विषमतेकडे घेवून जाण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते  नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर केला.

यावेळी बोलताना ते म्हणाले 19 मार्च रोजी महाडच्या चवदार तळ्यावर शुध्दीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या म्हणण्यानुसार हा कार्यक्रम माझा नव्हता तर सरकारचा कार्यक्रम होता.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर 20 मार्च 1927 रोजी मागासलेल्या लोकांना सार्वजनिक तळे, विहिरे ,एखाद्या जलस्त्रोतावर पाणी पिण्यासाठी, भरण्यासाठी बंदी असताना हे पाणी मागासांना देखील उपलब्ध व्हावे म्हणून देशभर यशस्वी आंदोलन केले, त्यामुळे बाबासाहेबांचे अनुयायी या दिवसानिमित्त  दरवर्षी त्याठिकाणी जाऊन तो दिवस साजरा करीत असताना  जलदिवस या नावाखाली राज्यभरात सर्वच जलस्त्रोतांवर जलपुजनाच्या नावाखाली जल शुध्दीकरणाचा कार्यक्रम या भाजपा सरकारने केलेला आहे. आणि याचे आदेश गिरीष महाजन यांनी दिल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

जागतिक जलदिन असताना मंत्रोपच्चार करुन शुध्दीकरण करण्याची गरज नाही परंतु कुठेतरी वर्णवादी मानसिकतेतून सरकारने  शुध्दीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे राज्याला पुन्हा एकदा विषमतेकडे घेवून जाण्याचा प्रकार असून याचा आम्ही निषेध करतो असे नवाब मलिक म्हणाले.