दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करताना सरकारने आणेवारी हा निकष ठेवावा.

Share this News:

– राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष  संग्राम कोते-पाटील यांची मागणी.

मुंबई  -दि.28 :दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्याची आवश्यकता असताना सरकारने फक्त परिक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना शब्दांचा खेळ करीत फक्त ‘ई.बी.सी’ धारक विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. यामुळे इतर दुष्काळग्रस्त विद्यार्थी सरकारी मदतीपासून वंचित राहत आहेत.त्यामुळे सरकारने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करताना फक्त ई.बी.सी धारक हा निकष न   आणेवारीचा निकष ठेवावा व त्यानुसार विद्यार्थ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले राज्यातील दुष्काळाचे हे तिसरे वर्ष आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच त्यांचे पालक देखील  हवालदिल झाले आहेत. विशेषतः मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, औरंगाबाद विद्यापीठामध्ये 3.85, नांदेड विद्यापीठामध्ये 1.75 लाख, पुणे विद्यापीठात 7.00 लाख,पश्चिम महाराष्ट्रात 2.30 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यापीठामधील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांकरिता 2016-17-18 अशा दोन वर्षांकरिता संपूर्ण संपूर्ण  शुल्क माफ केले जावे, तसेच सध्या शेतीचे दोन्ही हंगाम वाया गेले आहेत असे असतानाही काही ठिकाणी नाममात्र शुल्काबाबत देखील सक्ती करण्यात येत आहे,ती त्वरीत थांबविण्यात यावी, त्याचबरोबर राज्यातील ई.बी.सी व ओ.बी.सी विद्यार्थ्यांकरिता स्कॉलरशीपसाठी उत्पन्न मर्यादा 4.50 लाखा हून 6 लाख इतकी करण्यात यावी अशी मागणी पाटील यांनी केली.

पुढे बोलताना ते म्हणाले दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात जळगाव ,धुळे, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, रत्नागिरी आदी शहरांसह विविध शहरात 13 मोर्चे काढले, या मोर्चामध्ये 50 हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.एवढ्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरण्याचा प्रसंग महाराष्ट्रात 20 वर्षात पहिल्यादांच आला आहे.यावरून दुष्काळाची दाहकता व सरकारविरोधातील असंतोष दिसून येत आहे. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी सरकार सोबतच समाजातील उद्योजक तसेच श्रीमंत वर्गाने देखील मदत करण्याची गरज असल्याचे मत यावेळी संग्राम कोते-पाटील यांनी मांडले.