गौरी लंकेश हत्या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीला गोवण्याचे राजकीय षड्यंत्र !
के.टी. नवीन कुमार यांच्या पॉलिग्राफ टेस्टचा अहवाल पोलिसांनी का लपवला ?
बेंगळुरु (कर्नाटक) – येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणार्या विशेष अन्वेषण पथकाने (एस्आयटीने) मड्डूर (कर्नाटक) येथील हिंदु युवा सेनेचे श्री. नवीन कुमार यांच्यासह अन्य 4 जणांना अटक केली आहे. या संबंधी निवडक माहिती प्रसृत करून हिंदु जनजागृती समितीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असून त्यामागे राजकीय षड्यंत्र आहे. एकीकडे हिंदुत्ववाद्यांची नावे या प्रकरणात घेतली जात असतांना अटक केलेले संशयित श्री. नवीन कुमार यांच्या गुजरात येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये केलेल्या चाचणीचा आणि त्या चाचणी अहवालाचा उल्लेख पोलीस करतांना दिसत नाहीत. या चाचणीमध्ये श्री. नवीन कुमार यांच्याकडून पोलिसांनी जबरदस्तीने लिहून घेतलेल्या जबाबातील सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्ट होते. श्री. नवीन कुमार यांच्या काही कार्यकर्त्यांनीही पोलिसांनी मारहाण करून जबरदस्तीने खोटा जबाब लिहून घेतल्याचे पत्रकारांना सांगितले होते. त्यामुळे या जबाबात समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ता श्री. मोहन गौडा यांच्या संदर्भात केलेले सर्व दावे खोटे असल्याचे सिद्ध होते.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा यांनी गौरी लंकेश हत्या प्रकरणातील एक आरोपी असणारा प्रवीण याची नवीन कुमार यांच्याशी ओळख करून दिली होती, हा अत्यंत चुकीचा आणि खोटा आरोप आहे. या खोट्या आरोपांना खोडून काढत पत्रकार परिषदेत श्री. मोहन गौडा यांनी नवीनकुमार यांनी आरोप केल्याप्रमाणे सदर प्रकरणात आपला सहभाग आहे का, यासंदर्भात स्वत:ची नार्को चाचणी करून घेण्याची सिद्धता दर्शवली; मात्र त्याच वेळी
1. प्रखर हिंदुत्वनिष्ठ लेखक श्री. रोहित चक्रतीर्थ यांच्या हत्येची सुपारी देण्याचा आरोप असलेला दिनेश अम्मीन मट्टू याची नार्को चाचणी घेण्यात यावी.
2. या समवेतच महाराष्ट्रातील कोरेगांव-भीमा दंगलीत सहभाग असल्याचा आणि पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचण्याचा आरोप असलेला जिग्नेश मेवाणी याचीही नार्को चाचणी घेण्यात यावी.
गौरी लंकेश हत्या प्रकरणाचे अन्वेषण हे योग्य पद्धतीने आणि प्रामाणिकपणे व्हायला हवे. महाराष्ट्रातील दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्यांच्या अन्वेषणांत ज्याप्रकारे त्यांच्या संघटनांमधील घोटाळ्यांचा तपास करण्यातच आला नाही, तसे गौरी लंकेश हत्या प्रकरणात व्हायला नको, असे आवाहन श्री. गौडा यांनी या वेळी केले.
बेंगळुरु येथील प्रेस क्लब येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. गौडा बोलत होते. या वेळी श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, तसेच व्हॉइस ऑफ जस्टिसेस या संघटनेचे अध्यक्ष आणि बेंगळुरु उच्च न्यायालयात कार्य करणारे अधिवक्ता अमृतेश एन्.पी. हेसुद्धा या वेळी उपस्थित होते.
श्री. प्रमोद मुतालिक यांनी पत्रकारांना संबोधित करतांना म्हटले, भगव्या आतंकवादाचा बागुलबुवा करण्यासाठीच सनातन संस्थेच्या निर्दोष साधकांना ठाणे बॉम्बस्फोटात बळीचा बकरा बनवण्यात आले. त्याप्रमाणेच साध्वी प्रज्ञासिंह यांनाही मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात गोवण्यात आले. काँग्रेसचे हे षड्यंत्र नंतर जनतेसमोर आलेच ! अशाप्रकारेच कुभांड रचून मंगळुरु पब आक्रमणामध्ये मलाही गोवण्यात आले होते. शेवटी माननीय न्यायालयाने मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना निर्दोष घोषित केले.
अधिवक्ता अमृतेश एन्.पी. शेवटी म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींच्या संविधानिक अधिकारांची पायमल्ली केली जात आहे.
26/11 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झालेल्या पाकिस्तानच्या आतंकवाद्यास कायदेशीर साहाय्य देण्यात आले, मग गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींना ते नाकारले जाणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे का, असा प्रश्नही अधिवक्ता अमृतेश यांनी या वेळी उपस्थित केला.
कोणत्याही राजनीतिक दबावाखाली न येता एका स्वच्छ अन्वेषणाची मी या पत्रकार परिषदेद्वारे विनंती करतो, असे मोहन गौडा यांनी शेवटी म्हटले.
( गुजरात येथील डायरेक्टोरेट ऑफ फोरेन्सिक सायन्स या संस्थेने दिलेल्या सदर अहवालातून नवीन कुमार हे गौरी लंकेश यांना ओळखत नसल्याचे स्पष्ट होते. तसेच त्यांना भेटलेले प्रवीण हे आरोपी संभाजी ब्रिगेड या संघटनेचे असल्याचे सदर अहवालात स्पष्ट म्हटले आहे. तरी पोलीस या अहवालाला जाणीवपूर्वक दाबून हिंदु जनजागृती समितीची मानहानी करत आहेत, हे या निमित्ताने आम्ही प्रसारमाध्यमांना सांगू इच्छितो.)
